बॉलिवूड अभिनेता वरूण धवन हा नेहमीच त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसतो. मग ते चित्रपटाच्या माध्यमातून असो की सोशल मीडिया. त्याच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन नवीन तो शेअर करत असतो. महाशिरात्रीनिमित्त वरूणने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांची देखील पसंती मिळाली आहे.
Table of contents [Show]
वरुणच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा नेमका विषय काय आहे?
वरून धवनने त्याच्या या इन्स्टाग्राम मध्ये शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचे वडिल म्हणजे डेव्हिड धवन यांना त्याने बनवलेला खास पदार्थ कसा झाला हे विचारत आहे. वरूणने महाशिवरात्री निमित्त हलवा तयार केला आहे. डेव्हिड धवन खात असताना वरुण त्यांना हलवा कसा झाला आहे हे विचारतो. यावर डेव्हिड यांनी देखील वरूणचे कौतुक करत म्हटले आहे की, 'खूपच सुंदर झाला आहे. मी पहिल्यांदाच असा हलवा खातोय की ज्यात माझ्यासाठी इतक्या कमी साखरेचा वापर केला गेला आहे. मी आणखी एक वाटी खाणार आहे.' वरूणने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे, डॅड मी बनविलेला हलव्याचे समीक्षण करत आहेत.
वरूणच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. करिश्मा कपूर, आयुष्यमान खुराणा, अदिती राव हैदरी या कलाकारांनी देखील वरूणच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
याठिकाणी आपण गाजर हलव्याची रेसिपी तर बघणार नाही आहोत. पण त्यामागची आर्थिक उलाढाल समजून घेणार आहोत. असा 1 किलो हलवा तयार करायला खर्च किती येतो ते आधी बघूया.
घरी तयार करायला किती खर्च येतो?
साधारणपणे घरी 1 किलो गाजर हलवा बनवण्यासाठी 200 रुपये इतका खर्च येतो. यात गाजर, दूध, खवा, साखर, वेलची पूड, गॅस आदींचा खर्च समाविष्ट केला आहे. यंदा सिझनच्या सुरुवातीला गाजर 80 ते 100 रुपये किलो असे मिळत होते. नंतर किंमत 40 रुपये किलो इतकी कमी देखील झाली होती. खवा साधारण 500 ते 800 रुपये किलो आहे. याचेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर असतात.
विकत घ्यायला गेलात तर गाजर हलवा कसा मिळतो?
पण घरी एवढा व्याप कोण करत बसणार, असा विचार करत असाल तर विकत घेण्याचा पर्यायही तुमच्यासमोर आहेच. यासाठी 100 ग्रॅमला 80 रुपये किवा किलोमागे 800 रुपये असा दर तुम्हाला मिळू शकतो. सामान्यपणे 100 ग्रॅम हलवा तुम्हाला 75 रुपये ते 100 रुपया दरम्यानच्या किमतीत विकत घेता येईल.
विक्रेते काय म्हणतात?
गाजराच्या हलव्याचे अर्थकारण आणि त्यातल्या उलाढालीविषयी थोड अधिक जाणून घेण्यासाठी ‘महामनी’ ने काही प्रसिद्ध विक्रेत्यांशी संपर्क साधला. अॅप्रिकॉट फूड चे सेल्स पर्सन विक्रम पुजारा आणि रबडीवाला च्या कांदिवली ब्रांचचे मॅनेजर अखिल डोंगरे यांनी याविषयीची माहिती दिली. अॅप्रिकॉट फूड ने यंदाच्या सिझन मध्ये म्हणजे नोव्हेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत 580 किलो हलव्याची विक्री केली आहे. हे वेंडर कडून बनवून घेतलं जातं याचे मेकिंग चार्जेस दिले जातात. यात त्यांचे कमीत कमी 40 टक्के इतके मार्जिन असते.रबडीवाला यांनी 930 किलो विक्री केली आहे. हे स्वतः इन हाउस बनवतात यामुळे यात त्यांना किमान 100 टक्के मार्जिन मिळते. ही सर्व विक्री ऑनलाइन, ऑफलाइन अशी मालाड ते बोरिवली पसरलेल्या ग्राहकांच्या माध्यमातून झाली आहे.
एवढ सगळ जाणून घेतल्यावर गाजराचा हलवा विकत घ्यावा की घरीच तयार करावा, ते तुम्ही नक्की ठरवल असेल. तर मग घरीच करणार असाल तर रेसिपीही समजून घ्या, हलवा तयार करा आणि कसा झाला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.