उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशात जाण्यासाठी स्टुडंट व्हिसा गरजेचा असतो. मात्र, मागील काही दिवसांत व्हिसा मिळणाच्या प्रक्रियेत दिरंगाई होत आहे. अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्यास व्हिसा मिळण्यामध्ये तब्बल १ वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. व्हिसासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्यामुळे काऊंसलेट कार्यालयावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने दिरंगाई होत आहे.
पर्यटन आणि व्यावसायिक व्हिसा मिळण्यास आधीपासूनच प्रतिक्षा कालावधी होता. मात्र, आता विद्यार्थ्यांना व्हिसा मिळण्यातही अडचणी येत आहेत. हैदराबाद येथील काऊंसलेट कार्यालयाकडून व्हिसा मिळण्यात तब्बल 325 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी दाखवण्यात येत आहे. दुसऱ्या काऊंसलेट कार्यालयाद्वारे अर्ज करण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांकडे आहे. मात्र, सर्वच विभागीय कार्यालयांचा वेटिंग पिरियड जास्त आहे.
दिल्ली आणि चेन्नई येथील कार्यालयाद्वारे व्हिसा मिळण्यास 104 दिवसांचा तर कोलकात्यातून व्हिसा मिळण्यास 98 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी आहे. स्टुटंड व्हिसा मिळण्यासाठी आधी विद्यार्थ्याला मुलाखत द्यावी लागते आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. मात्र, अतिरिक्त अर्ज आल्यामुळे ही प्रक्रिया करण्यास वेळ लागत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
व्हिसा मिळण्यास उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुमारे वर्षभराचा प्रतिक्षा कालावधी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांची कॉलेजेस सुरू होण्याची शक्यता आहे. जर व्हिसा मिळाला नाही तर पुढील कोणतीही प्रक्रिया करता येणार नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचे पैसे वाया जाण्याची शक्यता आहे. 2022 वर्षात सर्वाधिक व्हिसा भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेकडून देण्यात आले. आधीचे सर्व रेकॉर्ड 2022 मध्ये मोडीत निघाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मागील वर्षात अमेरिकेने तब्बल 1 लाख 25 हजार भारतीय विद्यार्थ्यांना स्टुडंट व्हिसा दिला.