मोबाईल सेवा पुरवणाऱ्या व्होडाफोन या ब्रिटीश कंपनीला मोठी कर्मचारी कपात होऊ शकते. येत्या तीन वर्षांत कंपनी 11 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. ही कर्मचारी कपात कंपनीच्या धोरणात्मक योजनेचा एक भाग आहे, असे मानले जात आहे.
व्होडाफोनच्या नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्गेरिटा डेला व्हॅले (Margherita Della Valle) यांनी मंगळवारी कंपनीच्या महत्त्वाच्या धोरणात्मक योजनांची घोषणा केली. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही असे सांगत त्यांनी येत्या काळात कंपनीत कर्मचारी कपात केली जाईल याचे स्पष्ट संकेत दिले.
यावर बोलताना मार्गेरिटा डेला व्हॅले यांनी सांगितले की, कंपनीला सध्याची रचना सुलभ करायची आहे. या कारणासाठी कंपनीच्या संचालकांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या काळात बाजारात टिकायचे असेल तर आपण ग्राहकांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे आणि साधेपणाने, बचतीने कंपनीची वाढ केली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की, व्यवसायात साधेपणा आणण्यासाठी वोडाफोनच्या मुख्यालयात आणि देशोविदेशातील स्थानिक बाजारपेठेत विस्तारलेल्या वोडाफोनच्या कार्यालयातील सुमारे 11,000 नोकऱ्या कमी करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.
Vodafone (#Vodafone) reported fiscal 2023 adjusted EPS of €0.11, down from €0.12 a year earlier. The company presented a turnaround plan which includes 11,000 job cuts. #layoffs pic.twitter.com/ceDpqlGMJ5
— MarketsWay (@MarketsWay) May 16, 2023
एवढेच नाही तर कंपनीची व्यावसायिक चपळता वाढवण्यासाठी,कार्यक्षमता वाढविण्यासाठी आम्ही संसाधनाचे वाटप देखील कसे करता येईल याचा विचार करत असल्याचे जाहीर केले.म्हणजेच केवळ कंपनीच्या मुख्यालयातून सर्व योजना ठरणार नसून स्थानिक पातळीवर, ग्राहकांसोबत व्यवहार करताना येणाऱ्या अनुभवांच्या आधारे धोरणे आखली जातील असे त्यांनी म्हटले आहे.
मार्गेरिटा डेला यांना पाच महिन्यांसाठी कंपनीने अंतरिम सीईओ म्हणून नियुक्त केले होते. परंतु त्यांची कामगिरी आणि कामाचा झपाटा लक्षात घेता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांची कंपनीच्या सीईओपदी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीचे सीईओ निक रीड (Nick Read) हे होते ज्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजीनामा दिला होता. त्यांनी सलग चार वर्षे कंपनीची धुरा वाहिली होती, त्यांच्या कारकिर्दीत कंपनीच्या स्टॉकमध्ये लक्षणीय घट झाली होती.
1 हजार कर्मचाऱ्यांची आधीच कपात
वोडाफोनमध्ये कर्मचारी कपातीची घोषणा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या वर्षभरात कंपनीने 1 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे कारण देत बचतीचा मार्ग म्हणून कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.
जगावर जागतिक आर्थिक मंदीचे सावट असताना मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमाझोन आदी कंपन्यांनी कमर्चारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे. कोविडनंतर आता जागतिक बाजारपेठेत आर्थिक उलाढाल मंदावताना दिसते आहे. अमेरिका आणि युरोपमधील मोठमोठ्या बँका कोसळत असल्यामुळे जागतिक अर्थकारणात अनिश्चिततेचे चित्र निर्माण झाले आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.
भारतात देखील जाणवू शकतात परिणाम
2017 पर्यंत भारतात वोडाफोनने चांगली कामगिरी केली होती. भारतात आयडीया या टेलीकॉम कंपनीशी वोडाफोनचा करार ऑन, त्यांच्यासोबत भारतात व्यवसाय केला जातो आहे. परंतु जिओ कंपनीने भारतीय बाजरपेठेत प्रवेश केल्यानंतर वोडाफोन-आयडीया कंपनीच्या ग्राहकांमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळते आहे. कंपनीला भारत सरकारने देखील आर्थिक मदत केली होती.
2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या वोडाफोन-आयडीया कंपनीने वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे सरकारने व्होडाफोन आयडियाच्या 16,133 कोटी रुपयांहून अधिक व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली आहे. व्होडाफोन आयडिया प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याने सरकारला इक्विटी शेअर्स जारी करणार आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात देखील कर्मचारी कपात केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिओ, एयरटेल सारख्या तगड्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी ग्राहकांना कमी पैशात मोबाईल आणि इंटरनेट रिचार्ज उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत आहे.या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतात वोडाफोन-आयडीयाला नवीन धोरणे आखावी लागणार आहे.