अमेरिकेत ख्रिस्मस आणि न्यू ईयरच्या सणापूर्वी आलेल्या हिम वादळामुळे पूर्व किनाऱ्यावरची जवळ जवळ सगळी राज्य तडाख्यात सापडलीत. तिथल्या आपत्कालीन यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, तब्बल 20 कोटी लोकांना या वादळापासून धोका आहे. आणि आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाल्याचाही अंदाज आहे. अमेरिकेतलं आतापर्यंतचं हे सगळ्यात विनाशकारी वादळ मानलं जातंय. आणि एकाच वेळी 60% अमेरिकन जनतेला कुठल्या ना कुठल्या स्वरुपात याचा फटका बसलाय.
तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय. त्यामुळे रस्ते, महामार्ग यावर बर्फ साचलंय, विमानांची उड्डाणं रद्द करावी लागलीत. तर जवळ जवळ 7 कोटी घरांमध्ये वीज पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे ऐन थंडीत अनेक लोकांना हिटर शिवाय दिवस काढावे लागत आहेत. ऐन ख्रिस्मसमध्ये आलेल्या या वादळामुळे लोकांना त्यांच्या सुटीच्या योजनाहा रद्द कराव्या लागल्या. तर ख्रिस्मसचे कार्यक्रमही रद्द झाले.
एकट्या शुक्रवारी न्यूयॉर्कहून बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा परदेशात जाणाऱ्या 500 विमानांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे सणाच्या दिवसांत आपलं घर किंवा नातेवाईकांकडे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांचं नुकसान झालं. न्यूयॉर्क, मिसुरी, मिशिगन, ओहायो, टेनसी, शिकागो अशा जवळ जवळ सगळ्याच पूर्वेकडच्या राज्यांना वादळाचा फटका बसलाय.
यातला ओहायोमधला एक अपघात लक्षवेधी ठरला. महामार्गावरच्या बर्फावरून एक वाहन घसरल्यामुळे भरकटून इतर वाहनांवर धडकलं. आणि या अपघातात किमान 50 गाड्यांची टक्कर झाली. तर काही गाड्या एकमेकांवर चढल्या. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पण, त्याव्यतिरिक्त नुकसान खूप झालं.
ऐन थंडीत वीज गेल्यामुळे लोकांना अन्न शिजवणं, घर गरम ठेवणं अशी मूलभूत कामंही करता येत नाहीएत. वीज उपकेंद्र गोठल्यामुळे ही वेळ वीज ग्राहकांवर आलीय. प्रशासनाचे परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, बर्फ जमल्यामुळे अनेक भागांमध्ये पोहोचणंही कठीण जातंय.