US Student Visa: अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यास दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. मात्र, त्याआधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यातील महत्त्वाची एक प्रक्रिया म्हणजे व्हिसा. मात्र, व्हिसा मिळवण्यासाठी दूतावास कार्यालयात मुलाखत द्यावी लागते. त्यानंतरच व्हिसा मंजूर होता. चालू वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखती लवकरच सुरू होत आहेत.
व्हिसा मुलाखती किती काळ चालतील?
अमेरिकेत शिक्षण घ्यायला जाण्यासाठी F-1 व्हिसा अनिवार्य आहे. यासाठीच्या मुलाखती जुलैच्या मध्यावधीपासून ऑगस्टच्या मध्यावधीपर्यंत चालतील. विद्यार्थी आपल्या मुलाखतीचा स्लॉट बुक करू शकतात. भारतातील अमेरिकेच्या सर्व विभागीय राजदूत कार्यालयामध्ये या मुलाखती होतील.
मुलाखत कशी बुक कराल?
मुलाखत बुक करण्यासाठी अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाचे https://ustraveldocs.com हे अधिकृत पोर्टल आहे. ऑनलाइन तुम्ही मुलाखतीची बुकिंग करू शकता. यावर तुम्हाला Nonimmigrant Visa आणि Immigrant Visa अशा दोन कॅटेगरी दिसतील. यातील तुम्ही ज्या कॅटेगरीसाठी अर्ज केला आहे ती निवडा. व्हिसा अर्जाबाबतची सर्व माहिती अचूक भरावी लागेल. काही चूक झाली तर लवकरात लवकर दुरूस्त करून घ्या, असे म्हटले आहे.
तसेच जर व्हिसा अर्जाचे शुल्क तुम्हाला भरायचे असेल तर 10 जुलैच्या आत भरावे लागेल. 11 जुलै ते 14 जुलै या कालावधीत शुल्क भरण्याची सुविधा बंद असेल. 15 जुलै पासून शुल्क भरण्याची सुविधा पुन्हा सुरू होईल. जर तुम्ही व्हिसा शुल्क आधीच भरले असेल मात्र, तुमच्या प्रोफाइलला लिंक केले नसेल तर पावती क्रमांक टाकून लिंक करून घ्या.
मागील वर्षाची व्हिसा आकडेवारी?
मागील वर्षी सर्वाधिक 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना यूएस व्हिसा देण्यात आले. ही इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त संख्या आहे. दर पाच व्हिसा अर्जांपैकी 1 विद्यार्थ्याचा व्हिसा मंजूर करण्यात आला. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जास्त विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखती घेण्यात येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. या वर्षी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त असेल, असे अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे.