अमेरिकेतील मिडटर्म इलेक्शनमध्ये सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाची(Democratic Party) सरशी झाली आहे. मागील 40 वर्षांतील हा सर्वोत्तम निकाल असल्याचे सांगत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन जनतेचे आभार मानले. दरम्यान, 100 सदस्य संख्या असलेल्या यूएस सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोघांना समान 48 जागा मिळाल्या आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये (House of Representatives) रिपब्लिकन पक्षाचे 207 उमेदवार विजयी झाले आहेत. डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार 183 जागांवर जिंकले आहेत.
विजयानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमझध्ये पत्रकार परिषद घेतली. लोकशाहीसाठी आज चांगला दिवस होता, अशी भावना बायडेन यांनी व्यक्त केली. निकालाची आकडेवारी दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला कौल मिळाला असला तरी अंतिम आकडेवारी पाहता डेमॉक्रॅटिक पक्षाने चोख कामगिरी बजवली असल्याचे त्यांने सांगतले. त्याचबरोबर 2024 मध्ये पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत बायडेन यांनी यावेळी दिली. बायडेन याच महिन्यात 80 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत.
अमेरिकेसाठीची आखलेली धोरणे यापुढेही राबवली जातील, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी यावेळी दिली. 1986 नंतर पहिल्यांदाच मिडटर्म इलेक्शनमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अटीतटीची लढाई झाल्याचे दिसून आले. डेमोक्रॅटिक पक्षाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह काही जागांवर पराभूत व्हावे लागले.
यंदाची मध्यावधी निवडणूक विविध कारणांनी प्रतिष्ठेची बनली होती. माध्यमे आणि राजकीय विश्लेषकांनी मध्यावधीमध्ये रिपब्लिकन पक्षाची लाट येईल, असे अंदाज वर्तवले होते. मात्र जे काही निकाल हाती आले त्यावरुन रिपब्लिकन पक्षाची लाट आली नाही, असे बायडन यांनी सांगितले. बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला तेव्हा अमेरिकेत किमान एक कोटी नव्या रोजगार संधी निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा बेरोजगारी 6.4% होती हे प्रमाण 3.7% इतके खाली आले आहे.
मिडटर्म इलेक्शनमध्ये अॅरिझोना, जॉर्जिया आणि नेवाडा, विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये जो पक्ष दोन सिट जिंकेल त्या पक्षाच्या हाती यूएस सिनेटची सूत्रे जाणार आहेत.रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मात्र निकालांमुळे घोर निराशा झाली आहे. मिडटर्म इलेक्शनसाठी ट्रम्प यांनी जवळपास 300 उमेदवारांना संधी दिली होती. मात्र मोक्याच्या जागांवर त्यांचे निकटवर्तीय पराभूत झाले. हा निकाल निराशादायक असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.