रेल्वेच्या ज्या गाड्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असतील, त्यांना या सवलतीचा (Discount) लाभ मिळेल. ट्रेनमध्ये चढल्यानंतर टीटीईदेखील (Travelling Ticket Examiner) ही सवलत तुम्हाला देऊ शकणार आहे. या सवलतींचा लाभ स्पेशल ट्रेन (Special train) किंवा सणासुदीच्या काळात (Festival season) मात्र मिळणार नाही. ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढवण्याच्या हेतूनं रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.
फ्लेक्सी फेअर स्कीम तूर्तास मागे
रेल्वे मंत्रालयाची ही सवलत योजना अनुभूती आणि विस्टाडोम कोचच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासवरही लागू होणार आहे. तत्काल हा पर्याय प्रवासादरम्यान कोणत्याही स्ट्रेचमध्ये घेतल्यास त्याचा फायदा त्यावेळी मिळणार नाही. फ्लेक्सी फेअर स्कीम तूर्तास मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 25 टक्के सूट ही मूळ भाड्यावर असणार आहे. त्याचवेळी, जीएसटी, सुपर फास्ट सरचार्ज, आरक्षण शुल्क यासारखे इतर आवश्यक शुल्क स्वतंत्रपणे आकारले जाणार आहेत.
तिकीट बुक केल्यावर सवलत
मागच्या एक महिन्यापासून 50 टक्क्यांहून अधिक रिकाम्या असलेल्या गाड्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे, असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे. एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सवलत तत्काळ लागू करण्यात आली आहे. तसंच वंदे भारत ट्रेनचादेखील यात समावेश आहे. म्हणजेच तुम्ही आता तिकीट बुक केल्यास त्यावरही सवलत मिळणार आहे. जर तुम्ही तिकीट बुक केले असेल तर कोणताही परतावा मिळणार नाही.
निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी
ज्या गाड्यांमध्ये फ्लेक्सी फेअर स्कीम लागू आहे परंतु ऑक्यूपेंसी कमी आहे, तिथून ही योजना मागे घेतली जाईल. यामुळे जर प्रवासी संख्या वाढली नाही तर या गाड्यांमध्येदेखील ही सवलत योजना लागू केली जाणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, जर सवलत योजनेत काही बदल झाला असेल किंवा तो मागे घेतला गेला असेल तर तो तत्काळ लागू होईल. मात्र, ज्यांनी आधीच तिकीट बुक केलं आहे, त्यांच्याकडून किंमतीतला फरक आकारला जाणार नाही.