US Student Visa: अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यास भारतीय विद्यार्थी इच्छुक असतात. अमेरिकेच्या राजदूत कार्यालयांकडे दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज येतात. (US Student visa appointment date) मुलाखतीनंतरच परदेशात शिक्षण घेण्यासाठी व्हिसा देण्यात येतो. यावर्षीच्या मुलाखती मे महिन्याच्या मध्यावधीपासून सुरू होतील, असे अमेरिकेच्या काउन्सलेट कार्यालयाने म्हटले आहे. हार्वड, येल, मॅसाच्युसेट, प्रिंन्सटन, स्टॅन्डफोर्ड, कॅलिफोर्नियासह अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांत शिक्षण घेण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मागील काही वर्षात परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
युएस काउन्सलेटने काय ट्विट केले
मुलाखती कधीपासून सुरू होतील, याबाबत अमेरिकेच्या काउन्सलेट कार्यालयाने ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! मे महिन्याच्या मध्यावधीपासून अमेरिकेचे राजदूत कार्यालय स्टुडंट व्हिसासाठी पहिल्या बॅचच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करेल. नंतरच्या बॅचबाबतची माहिती अपडेट केली जाईल. मुलाखतीची तयारी करा आणि पुढील घोषणांवर लक्ष ठेवा". असे ट्विट अमेरिकेच्या हैदराबाद येथील काउन्सलेट कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
स्टुडंट व्हिसाबाबत दिरंगाई
मागील वर्षी नियोजित वेळेत सर्व स्टुडंट व्हिसाच्या मुलाखती झाल्या नव्हत्या. (US Student visa appointment) भारतातील प्रमुख शहरांतील काउन्सलेट कार्यालयात मुलाखती घेतल्या जातात. मात्र, जास्त अर्ज आल्यामुळे तब्बल एक वर्षापर्यंतचा वेटिंग पिरियड होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला. शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी मुलाखती न झाल्याने विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला होता. ही नामुष्की टाळण्यासाठी यावर्षी काउन्सलेट कार्यालयाने जोरदार तयारी केली आहे. विद्यार्थी आणि नोकरीसाठी अमेरिकेत जाणाऱ्यांना प्राधान्याने व्हिसा देण्यात येईल, असे दूतावास कार्यालयाने म्हटले आहे.
अमेरिकेत नवे शैक्षणिक वर्ष शरद ऋतूपासून म्हणजेच सप्टेंबरपासून सुरू होते. त्याला "फॉल सिझन" असेही म्हणतात. तसेच पहिल्या सहामाईस फॉल सेमेस्टर असेही बोलले जाते. या बॅचला प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज तत्काळ निकाली काढले जातील, असे बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मागील वर्षी व्हिसा मुलाखतींना उशीर झाल्याच्या बातम्या आल्यानंतर प्रशासन सावध झाले आहे.
व्हिसा वेवियर(सूट) प्रोग्राम
व्हिसा वेवियर कार्यक्रमांतर्गत मुलाखतीतून सूट देण्यात येते. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अल्पकालीन संशोधक यांनी काही ठराविक अटींची पूर्तता केल्यास त्यांना मुलाखत माफ असते. त्यांना थेट व्हिसा दिला जातो. आधीच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर 48 महिन्यांच्या आत रिन्यू करणाऱ्यांनाही मुलाखतीपासून सूट देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार 232,851 भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. प्रथम क्रमांकावर चीन आहे. कोरोनाकाळात ही संख्या रोडावली होती. मात्र, आता पुन्हा परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.