Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023-Paperless Budget: यंदाही संसदेत पेपरलेस बजेट सादर होणार, बजेट छपाईचा इतिहास माहित आहे का?

Union Budget 2023

Union Budget 2023-Paperless Budget: बजेट छपाईचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने वर्ष 2021 पासून बजेटच्या पुस्तिकांची छपाई बंद केली आहे. त्याऐवजी डिजिटल स्वरुपात बजेट लोकप्रतिनिधींना पुरवले जाते.

budget-banner-revised-jpg-1.jpg

केंद्र सरकारने डिजिटल इकॉनॉमीप्रमाणेच अर्थसकंल्प सादर करण्याच्या पद्धतीत देखील मागील काही वर्षात सुधारणा केली आहे. वर्ष 2021 पासून अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत डिजिटल स्वरुपात बजेट सादर करतात. लेदर बॅग मग बहीखाता बुक आणि आता टॅबलेटमधून सादर होणारे बजेट असा अर्थसंकल्पाचा प्रवास राहिला आहे. यंदाही 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पेपरलेस बजेट सादर करणार आहेत. 

अर्थ मंत्रालयाने 1980 ते 2020 अशी जवळपास 40 वर्ष बजेटच्या डॉक्युमेंट्सची छपाई केली आहे. दिल्लीत नॉर्थ ब्लॉक इमारतीच्या तळघरात बजेट छपाई केली जात असे. या ठिकाणी बजेटशी संबधित 14 विविध डॉक्युमेंट्सची छपाई गोपनीय पद्धतीने केली जात आहे. मात्र वर्ष 2021 पासून सरकारने डिजिटल स्वरुपातील बजेटला स्वीकारले आहे. बजेट छपाईचा अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून डिजिटल बजेटचा निर्णय घेण्यात आला.

अर्थ मंत्रालयात बजेट छपाई होण्यापूर्वी अर्थात 1980 पूर्वी राष्ट्रपती भवनमध्ये काही वर्ष बजेट छपाई झाली होती. मात्र बजेटमधील काही गोपनीय दस्तांची माहिती उघड झाल्यानंतर वर्ष 1950 मध्ये छपाईची प्रक्रिया मिंटो रोडवरील सरकारी प्रेसमध्ये हलवण्यात आली होती. अखेर 1980 मध्ये बजेट छपाईची जबाबदारी अर्थ मंत्रालयावर सोपवण्यात आली. नॉर्थ ब्लॉकमधील तळघरात बजेट छपाई तब्बल 40 वर्ष सुरु होती.

यात अर्थमंत्र्यांकडून बजेट डॉक्युमेट सुटकेसमधून संसदेत आणायचे. त्यांच्यासोबत अर्थ खात्यातील सचिव असायचे. वर्ष 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुटकेस ऐवजी वही खाता पुस्तिके मधून बजेट डाक्युमेंट संसदेत आणले. पुढे यातही सुधारणा झाली आणि वर्ष 2022 मध्ये निर्मला सीतारामन यांनी लाल कापडात गुंडाळून टॅबलेटमध्ये डिजिटल बजेटचे सादरीकरण केले.

तुम्हीही डाऊनलोड करु शकता बजेट 

बजेट सादर झाल्यानंतर काही क्षणातच ते मोबाइल अॅपवर उपलब्ध करण्यात येते. www.indiabudget.gov.in या वेबसाईटवरुन बजेट डाऊनलोड करता येते. यंदाचे पेपरलेस बजेट 1 फेब्रुवारी 2023 रोजी युनियन बजेट मोबाइल अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. सरकारने बजेट डाऊनलोड करण्याचा किमान लॉक इन कालावधी दोन आठवड्यांवरुन केवळ पाच दिवस इतका कमी केला आहे.