क्लोज-एंडेड डेब्ट फंड यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते आणि यात कमी धोका असतो. गुंतवणूकदार सर्वसाधारणपणे त्यांच्या पोर्टफोलिओसाठी डेब्ट फंडाच्या शोधात असतात. पण त्यांना पारंपरिक नेहमीच्या बॅंक एफडी (Bank FD), बॉण्ड्स (Bonds), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) आणि पोस्टाच्या योजनांचाच आधार घ्याव्या लागतो. बऱ्याच गुंतवणूकदारांना हे देखील माहित नाही की, यातून चांगली कर सवलत ही मिळत नाही. तसेच या योजनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि प्रोव्हिडंट फंड (PF) वगळता टॅक्स आकारला जातो. सरतेशेवटी टॅक्स कापून जो परतावा हातात मिळतो तो महागाईच्या दरापेक्षा (Inflation Rate) खूपच कमी असतो. हे टाळण्यासाठी फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (FMP) हा गुंतवणुकीसाठी एक चांगला मार्ग कसा ठरू शकतो, याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.
फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (FMP) म्हणजे काय?
फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (FMP) हा क्लोज-एंडेड डेब्ट म्युच्युअल फंड आहे (FMP is a closed-ended debt mutual fund). वेगवेगळे म्युच्युअल फंड एफएमपी (FMP) ही योजना एनएफओ (New Fund Offer) द्वारे बाजारात घेऊन येतात. यातील गुंतवणुकीचा कालावधी दोन ते तीन दिवसांचाच असतो. ज्या दिवशी एफएमपी एनएफओ सुरू होतो त्याला ओपनिंग डेट व ज्या दिवशी गुंतवणुकीसाठी बंद होतो, त्याला क्लोजिंग डेट म्हणतात.
एफएमपीचा कालावधी
एफएमपी फंड हा साधारणत: त्याच्या कालावधीच्या योजनेतच गुंतवणूक करतो. उदाहरणार्थ, एफएमपीचा कालावधी 1115 दिवसांचा आहे, तर यातील गुंतवणूक ही 1115 दिवसांकरीता किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या योजनेत गुंतवली जाते. व्याजदरातील चढ-उताराचा धोका कमी करण्यासाठी अशा पद्धतीने गुंतवणूक केली जाते. डेब्ट फंडाच्या गुंतवणुकीतून स्थिर परतावा मिळवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही फायदेशीर योजना मानली जाते.
एफएमपीमध्ये कोणी गुंतवणूक करावी?
ज्या गुंतवणूकदारांना डेब्ट फंडापेक्षा जास्तीचा परतावा (Return) अपेक्षित आहे आणि ते थोडीफार जोखीम घेण्यासाठी तयार आहेत, अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण यातून मिळणारा परतावा हा बाजारातील व्याजदरात होणाऱ्या बदलांवर अवलंबून असतो. त्यामुळे यातून मिळणारा परतावा इंडिकेटिव्ह परताव्यापेक्षा कमी-अधिक होऊ शकतो. तसेच गुंतवणूकदाराला यातील रक्कम मुदतीपूर्वी काढता येत नाही.
एफएमपीमधली गुंतवणूक कोठे केली जाते?
एफएमपीमधील (FMP) गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारच्या डेब्ट मार्केट सिक्युरिटीजमध्ये केली जाते, जसे की, अपरिवर्तनीय कर्जरोखे (Non-Convertible Debentures), कॉर्पोरेट/सरकारी बाँड्स (Corporate/Government Bonds), ट्रेझरी बिले (Treasury Bills), कमर्शियल पेपर्स (Commercial Papers), ठेवी (Certificates of Deposit) आणि बँक एफडी (Fixed Deposit) यांमध्ये केली जाते.
एफएमपीमध्ये गुंतवणूक कशी करावी?
फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये (FMP) फक्त त्याच्या नवीन फंड ऑफर (NFO) कालावधीतच गुंतवणूक करता येते.
फंडच्या मॅच्युरिटी नंतर काय?
एफएमपी फंडचा कालावधी संपला किंवा त्याची मॅच्युरिटी झाली की त्यातील रक्कम रिडीम (Redeemed) होते आणि शेवटी ती गुतंवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते.