• 04 Oct, 2022 16:32

UK In Recession: याच वर्षात ब्रिटन मंदीच्या फेऱ्यात अडकणार, बँक ऑफ इंग्लडचे संकेत

UK Economy

UK Economy and Inflation: महागाईने जगभरात थैमान घातले आहे. विकसित देशांना महागाईने घोर लावला आहे. ब्रिटनमध्ये महागाईचा पारा 10.1% इतका वाढला आहे. महागाई अशीच वाढत राहिली तर याच वर्षात ब्रिटन मंदीच्या फेऱ्यात अडकेल, अशी भीती तेथील केंद्रीय बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केली आहे.

मागील सात महिन्यांपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेनचे युद्धाची झळ आता युरोपातील प्रमुख देशांना बसू लागली आहे. ब्रिटनला (United Kingdom) या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. ब्रिटनमध्ये महागाई दर 10.2% इतका वाढला आहे.फेब्रुवारी 1982 नंतर महागाईने पहिल्यांदाच इतका उच्चांकी स्तर गाठला आहे. दुसऱ्या तिमाहीत यूकेचा जीडीपी 3.5% इतका खाली आला आहे.  

ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटेस्टिक्स (ONS) च्या आकडेवारीनुसार जुलै 2022 मधील महागाईची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. यापूर्वी फेब्रुवारी 1982 मध्ये ब्रिटनमधील महागाई दर 10.2% इतका वाढला होता. महागाईचा भडका उडण्यास खाद्य वस्तूंच्या वाढत्या किंमती कारणीभूत ठरल्या आहेत. ब्रेड, धान्य, डाळी याशिवाय दूध, चीज आणि अंडी यांच्या किंमतीत मागील दोन महिन्यात वाढ झाली आहे. बेकरी उत्पादने, भाजीपाला, मटणाच्या किंमतीत वाढ झाल्याने ब्रिटीश नागरिकांच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

 खाद्य इतर वस्तूंच्या किंमतीत देखील सातत्याने वाढ होत आहे. यात पेट फूड, टॉयलेट रोल्स, टूथब्रश, डिओ या वस्तूंच्या किंमतींनी महागाईत आणखी भर घातली आहे. हा ट्रेंड असाच सुरु राहिला तर ऑक्टोबरमध्ये महागाई दर 13.3% इतका वाढेल, असे भाकीत बँक ऑफ इंग्लंडने केले आहे. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर भाड्याने राहणाऱ्यांना जादा भाडे द्यावे लागत आहे.क्रेडीट कार्ड आणि बँकांची कर्जे आणखी महाग झाली आहेत. ब्रिटनमधील राहणीमान सामान्य ब्रिटीश नागरिकांसाठी प्रचंड खर्चिक बनले आहे.  

‘जीडीपी’ला बसणार फटका

दि ब्रिटीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या (BCC) मते चालू वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत महागाई दर 14% इतक्या विक्रमी पातळीपर्यंत पोहचू शकतो. 2023 मध्ये महागाई 5% इतका खाली येईल. विकास दर मात्र 3.3% इतका कमी होण्याचा अंदाज BCC ने व्यक्त केला आहे. 2021 मध्ये ब्रिटनचा जीडीपी 21% इतका होता. सलग दोन तिमाही किंवा सहा महिने विकास खुंटला आणि महागाईचा पारा वाढला तर अर्थव्यवस्थेला मंदीच्या चक्रव्यूहात फसली असे मानले जाते. ब्रिटनची अर्थव्यवस्था सध्या त्याच दिशेने पुढे सरकत आहे.

मंदी दिर्घकाळ राहणार 

बँक ऑफ इंग्लडने मागील पतधोरणात व्याजदर 0.50% ने वाढवला होता.मागील 27 वर्षांत पहिल्यांदाच बँक ऑफ इंग्लंडने मोठी दरवाढ केली होती. दरवाढीनंतर बँकेचा व्याजदर 1.75% इतका झाला आहे. 2009 नंतरचा बँकेचा हा सर्वाधिक व्याजदर आहे.देशातमहागाई चांगलीच वाढली आहे. यामुळे बँकेने ब्रिटन मंदीच्या गर्तेत सापडेल,अशी भीती व्यक्त केली आहे.महागाईचा पारा असाच चढत राहिला तर याच महिन्यात देशात मंदी येईल, अशी भीती बॅंक ऑफ इंग्लडचे गव्हर्नर अॅंड्रू बेली यांनी व्यक्त केली होती. महागाई पाठोपाठ येणारी मंदी ही दिर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये जेव्हा ब्रिटनमधील बँकिंग यंत्रणा कोलमडली होती तेव्हा आलेल्या मंदीपेक्षा यावेळी मंदीची दाहकता अधिक असेल असा अंदाज बँकेने व्यक्त केला आहे.2023 ब्रिटनला महागाईचे चटके सोसावे लागतील, असे बँकेनं म्हटलं आहे.