• 04 Oct, 2022 15:27

ब्रिटन मंदीच्या उंबरठ्यावर, बँक ऑफ इंग्लंडने दिला महामंदीचा इशारा

ब्रिटन मंदीच्या उंबरठ्यावर, बँक ऑफ इंग्लंडने दिला महामंदीचा इशारा

सध्या जगातील सर्वच प्रमुख देशांना महागाईने ग्रासले आहे. युरोप आणि अमेरिकेत महागाई उच्चांकावर आहे. त्यामुळे तेथील केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवण्याचा सपाटा लावला आहे. यातून जागतिक मंदीचे संकेत मिळत आहेत.

इंग्लंडची केंद्रीय बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लडने व्याजदरात 0.50% वाढ केली आहे. मागील 27 वर्षांत पहिल्यांदाच बँक ऑफ इंग्लंडने इतक्या मोठ्या प्रमाणात व्याजदरात वाढवला आणि तो 1.75% केला. 2009 नंतरचा बँकेचा हा सर्वाधिक व्याजदर आहे. ब्रिटनमध्ये महागाईचा पारा 13% वर गेला आहे. ज्यामुळे बँकेने ब्रिटन मंदीच्या गर्तेत सापडेल, अशी भीती व्यक्त केली आहे. 

युके (United Kingdom) मध्ये महागाईचा भडका उडण्यास रशिया-युक्रेनचे युद्ध कारणीभूत ठरले आहे. कारण मागील काही महिन्यात ब्रिटनमध्ये विज बिलांच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. महागाईचा पारा असाच चढत राहिला तर येत्या तीन महिन्यात विज बिलांचा आकडा 300 युरोपर्यंत वाढेल, अशी भीती बॅंक ऑफ इंग्लडचे गव्हर्नर अॅंड्रू बेली यांनी व्यक्त केली. वाढत्या खर्चामुळे ब्रिटनमध्ये जगणं कठिण होत असले तरी व्याजदर न वाढवल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, असे सांगत बेली यांनी बँकेच्या व्याजदर वाढीचे समर्थन केले.

ब्रिटनची परिस्थिती बिकट होण्यामागे रशिया आणि युक्रेन युद्ध हेच मुख्य कारण  असल्याचे बेली यांनी सांगितले. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर भाड्याने राहणाऱ्यांना जादा भाडे द्यावे लागणार आहे. क्रेडीट कार्ड आणि बँकांची कर्जे आणखी महाग होतील. सध्या ब्रिटनमध्ये बोरीस जॉन्सन यांचा उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया सुरु आहे. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या लिझ ट्रस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

मंदीच्या दिशेनं वाटचाल

महागाई पाठोपाठ येणारी मंदी ही दिर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये जेव्हा ब्रिटनमधील बँकिंग यंत्रणा कोलमडली होती तेव्हा आलेल्या मंदीपेक्षा यावेळी मंदीची दाहकता अधिक असेल असा अंदाज बँकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. 2023 या संपूर्ण वर्षात महागाईचे चटके सोसावे लागतील, असे बँकेनं म्हटलं आहे. जून 2022 मध्ये युकेचा महागाई दर 9.4% इतका वाढला. मागील 40 वर्षातील तो उच्चांकी पातळीवर गेला. खाद्य वस्तू आणि एनर्जीच्या किंमतींनी महागाईचा भडका उडाला.