भारतीय महिला अंडर-19 संघाने रविवारी पहिल्या-वहिल्या अंडर-19 टी-20 विश्वचषकाच्या (U19 Women T20 World Cup) अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करून इतिहास रचला. भारताने (Team India) विजयासाठी दिलेले 69 धावांचे लक्ष्य 14 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. कोणत्याही भारतीय महिला संघाचे हे पहिले जागतिक विजेतेपद आहे. सिनीअर टीम सर्व फॉर्मेटमध्ये तीन वेळा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला, परंतु प्रत्येक वेळी विजेतेपद मिळवण्यात त्यांना अपयश आले.
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी 5 कोटी रुपये
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI - Board of Control for Cricket in India) शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी खजिना खुला केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी 5 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संघाचा सन्मान करण्यासाठी या संघाला आमंत्रण देण्यात आले आहे.
महिला क्रिकेटची मान उंचावली
भारतीय महिला अंडर-19 संघासाठी इतिहास रचल्याबद्दल जय शाह यांनी ट्विट केले की, “U19 संघाचे अभिनंदन. ही अभूतपूर्व कामगिरी आहे. आपल्या युवा क्रिकेटपटूंनी देशाचा गौरव केला आहे. मी @TheShafaliVerma आणि त्यांच्या विजयी संघाला नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे आमच्यासोबत सामील होण्यासाठी आणि 1 फेब्रुवारी रोजी 3रा T20I पाहण्यासाठी आमंत्रित करतो. भारतात महिला क्रिकेट वाढत आहे आणि विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा खूप उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी 5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे.”
सौम्या तिवारी 24 धावा करून नाबाद राहिली
अंडर-19 महिला विश्वचषक (U19 Women T20 World Cup) च्या फायनलमध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला (England Women’s U-19) अवघ्या 68 धावांत गुंडाळले. तीतास साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन, तर मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लक्ष्याचा सहज पाठलाग करताना भारताकडून सौम्या तिवारी 24 धावांवर नाबाद राहिली. गोंगडी तृषानेही 24 धावा केल्या परंतु ऐतिहासिक विजयापासून केवळ तीन धाव दूर असताना ती बाद झाली.