मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात उद्योगपती एलन मस्क यांनी बलाढ्य सोशल मीडिया कंपनी ट्विटर ताब्यात घेतली. मात्र, तेव्हापासून कंपनीच्या उत्पन्नाला उतरती कळा लागली आहे. एलन मस्क यांनी कंपनीमध्ये अनेक निर्णय एकतर्फीपणे घेतल्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक स्थिरतेवर झाला. निम्म्यापेक्षा जास्त कर्मचारी कपात, ट्विटर खात्यांवरील बंदी, विवादित खाती पुन्हा सुरू करण्यास अनेक निर्णय मस्क यांनी घेतले. यामुळे मोठ्या जाहिरातदारांनी ट्विटरवर जाहिरात करणे बंद केले आहे. याचा फटका कंपनीच्या उत्पन्नाला बसला आहे.
सर्वात जास्त महसूल जाहिरातीमधून( Twitter revenue from advertising)
ट्विटरचा 90 टक्क्यांपेक्षा जास्त महसूल जाहिरांतीमधून येतो. मात्र, ट्विटरसाठी जाहिरात देणाऱ्या टॉप कंपन्यांनी जाहिराती देणं बंद केले आहे. रियटर्स या वृत्तवाहिनीने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. ऑक्टोबरनंतर जाहिरातीतून येणाऱ्या उत्पन्नाला उतरती कळा लागल्याचे म्हटले आहे. आघाडीच्या 30 कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांनी ट्विटरवर पोस्ट करण्यात येणाऱ्या जाहिराती कमी केल्या आहेत. तर चार कंपन्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त ट्विटर जाहिरातींसाठीचे बजेट कमी केले आहे.
35 टक्क्यांनी उत्पन्न कमी(Twitter revenue declined by 35%)
30 मोठ्या कंपन्यांनी ट्विटरवरील जाहिरात खर्चात एकूण 42% कपात केली आहे. हे प्रमाण 53 मिलियन डॉलर इतके मोठे आहे. आतापर्यंत ट्वटिरला 270 बिलियन डॉलर इतका तोटा झाला आहे. तर चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ट्विटरचा महसूल 35 टक्क्यांनी कमी झाला आहे. भविष्यांमध्ये जाहिरातींसाठी स्पेस विकत घेण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत ट्विटरचे उत्पन्न रोडावणार असल्याची शक्यता आहे.
कोणत्या कंपन्यांनी थांबवल्या जाहिराती
कोकाकोला, फायझर, हाइंझ केचअप, नेसले एचबीओ यासारख्या बड्या कंपन्यांनी ट्विटरवरील जाहिरातीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चात मोठी कपात केली आहे. मात्र, याच काळात पेप्सीको, अॅमेझॉन कंपन्यांनी ट्विटरवरील जाहिरातींमध्ये वाढ केली आहे. यातील काही कंपन्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉवरील जाहिरातींमध्ये जास्त खर्च करण्यास सुरुवात केली आहे.