Student Internship: विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधताना कामाचा अनुभव आहे का? असा प्रश्न HR कडून सर्रास विचारला जातो. जर अनुभव नसेल तर कामावर घेण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे कोणतीही डिग्री किंवा कोर्स पूर्ण झाल्यावर इंटर्नशिप करू शकता. याद्वारे नक्की त्या क्षेत्रातील काम कसे चालते, त्यातील बारकावे माहिती होतील. अनुभव आणि कामाचे पैसेही मिळतात.
काम शिकून घेण्यासाठी इंटर्नशिप हा सर्वोत्तम पर्याय आहे. तीन ते सहा महिन्यांपर्यंतची इंटर्नशिप तुम्हाला फुल टाइम जॉब मिळण्यात मोठी मदत करते. तसेच त्यामुळे मुलाखत देण्यासही सोपे जाते. हा एक प्रकारे ऑन जॉब ट्रेनिंगचाच प्रकार आहे. ज्यातून तुम्ही कौशल्य आत्मसात करू शकता. भारतात इंटर्नशिप मिळवून देणाऱ्या आघाडीच्या वेबसाइट कोणत्या आहेत ते पाहूया.
ग्लासडोअर
ग्लासडोअर या संकेतस्थळावर तुम्हाला विविध क्षेत्रातील इंटर्नशिप मिळवू शकतात. पाच हजार ते पंधरा हजारांपेक्षा जास्त पैसे इंटर्नशिपमधून मिळू शकतात. मार्केटिंग, मीडिया, आयटी, फार्मा, रिटेल, फायनान्स यासह इतर अनेक क्षेत्रातील विविध जॉब प्रोफाइलसाठी इंटर्नशिपच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते या संकेतस्थळावर तुम्हाला पाहता येतील. तुमची प्रोफाइल अपडेट करून तुम्ही अप्लाय करू शकता. मुलाखतीची तयारी चांगली केली तर इंटर्नशिप लवकर मिळू शकते. या लिंकवर जाऊन तुम्ही ओपनिंग पाहू शकता.
इंटरशाला
इंटरशाला हा सुद्धा इंटर्नशिप मिळवण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे. विविध इंडस्ट्रीमधील जॉब्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मल्टिनॅशनल कंपन्यांसह इतरही छोट्या मोठ्या कंपनीतील संधी तुम्हाला येथे दिसतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटर्नशिप मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते. मुलाखतीची चांगली तयारी, अपडेटेड रेझ्युमे, आणि इंटर्नशिपसाठी तुम्ही कसे योग्य आहात, हे HR ला पटवून देण्यात यशस्वी झालात की तुमचे काम झालेच समजा. या लिंकवर तुम्हाला इंटर्नशिपची माहिती मिळेल.
आयडिया लिस्ट
आयडिया लिस्ट हे संकेतस्थळ देखील खास इंटर्नशिप मिळवण्यासाठी आहे. येथेही विविध क्षेत्रातील इंटर्नशिपच्या ओपनिंगसाठी अप्लाय करता येईल. तुमच्या शहरात किंवा जवळच्या कंपन्यांमध्ये तुम्ही इंटर्नशिप शोधू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे संबंधीत क्षेत्रातील ज्ञान अपडेटेड आहेत, त्यांना कंपनी प्राधान्य देते. समजा, डेटा अॅनलिस्ट या क्षेत्रासाठी तुम्ही इंटर्नशिप मिळवू इच्छित आहात, तर तुम्हाला लेटेस्ट ट्रेंड्स, टुल्स, टेक्निक्स, रिसोर्सेस याची माहिती हवी. कॉलेजमध्ये केलेल्या प्रोजक्टची नीट माहिती दिल्यास तुम्हाला इंटर्नशिप मिळण्याची शक्यता वाढते. या लिंकवर तुम्हाला संधी शोधता येतील.
ग्लोबल एक्सपिरिअन्स
ग्लोबल एक्सपिरिअन्स या संकेतस्थळाद्वारे तुम्ही जगभरात कोठेही इंटर्नशिप मिळवू शकता. सर्वांसाठी हे शक्य होणार नाही. मात्र, जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि परदेशात शिक्षण घेत असताना इंटर्नशिप करायची असेल तर या पोर्टलवर जाऊन प्रोफाइल अपडेट करू शकता. विविध देशातील इंटर्नशिपच्या संधी तुम्हाला दिसतील. या लिंकवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
यासह इतरही अनेक पोर्टल आहेत, ज्याद्वारे तुम्ही इंटर्नशिप मिळवू शकता. मात्र, त्यासाठी इंटरनेटवर योग्य रिसर्च करावा लागेल. एकापेक्षा जास्त संकेतस्थळांवर प्रोफाइल अपडेट केली तर संधी मिळण्याची शक्यता वाढते. तुमचे जर कॉलेज किंवा कोर्स पूर्ण झाला असेल तर मुलाखतीची तयारी, रेझ्युमे, तुमच्या क्षेत्राबद्दलची अद्ययावत माहिती घेण्यावर भर द्या. लिंक्डइन सारख्या साइटवर सुद्धा इंटर्नशिपच्या संधी मिळतील. तसेच त्यामुळे तुमच्या क्षेत्रातील लोकांशी नेटवर्क वाढवता येईल.