Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमी गुंतवणूक जास्त फायदा! 2024 मध्ये सुरू करू शकता ‘हे’ 10 सर्वोत्तम व्यवसाय, पाहा लिस्ट

Business Ideas

Image Source : https://www.freepik.com/

अनेकांना भांडवलाच्या कमतरतेमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही. परंतु, काही व्यवसाय असे आहेत, जे अगदी कमी गुंतवणूक करून सुरू करता येतील.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत अनेक नाविन्यपूर्ण कल्पना देखील असतात. परंतु, मोठी गुंतवणूक करणे व जोखीम स्विकारण्याची प्रत्येकाचीच तयारी नसते. संपूर्ण आयुष्यभराची कमाई व्यवसायात गुंतवायची व त्यात यश मिळाले नाही तर? अशी भिती अनेकांना वाटते. 

अनेक असे व्यवसाय आहेत जे अगदी खूपच कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करणे शक्य आहे. मात्र, व्यवसायाबाबत केवळ नाविन्यपूर्ण कल्पना असणे पुरेसे नाही. व्यवसायासंबंधित गुंतवणूक, जोखीम, मार्केट क्षेत्र, ग्राहक क्षमता असे संपूर्ण ज्ञान तुम्हाला  असणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात अनेक व्यवसाय हे ऑनलाइन माध्यमातून चालतात. त्यामुळे तुम्हाला व्यवसायाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येणे देखील गरजेचे आहे. 

तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला अशाच काही 10 सर्वोत्तम व्यवसायाबाबत माहिती देत आहोत, जे तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये सुरू करून जास्तीत जास्त नफा कमवू शकता. वर्ष 2024 मध्ये तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करू शकता, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

business-ideas-1.jpg
https://www.freepik.com/

ब्रेकफास्ट स्टॉल

तुम्ही तुमच्या भागामध्ये ब्रेकफास्ट स्टॉल सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त खर्च देखील येत नाही. अवघ्या 20 ते 25 हजार रुपयामध्ये हा व्यवसाय सुरू करता येईल. तुमचे बजेट थोडे जास्त असल्यास एखादे शॉप भाड्याने घेऊन तेथे हा व्यवसाय सुरू करू शकता. 

विशेष म्हणजे तुम्हाला जर सुरुवातीच्या टप्प्यात मोठी गुंतवणूक करायाची नसेल व जोखीम स्विकारायची नसल्यास नोकरीसोबतच हा व्यवसाय करणे शक्य आहे. पोहे, इडली, समोसा, वडापावची विक्री करणारे अनेक स्टॉल तुम्ही तुमच्या आजुबाजूला पाहिले असेल. तुम्ही देखील अशाप्रकारचा स्टॉल कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. 

तुमच्या भागातील पार्क, जिम अशा गर्दीच्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरेल. तुम्हाला जर विविध पदार्थ बनविणे शक्य नसल्यास त्याऐवजी ज्यूस पॉइंट, आइस्क्रीम पार्लर देखील सुरू करता येईल. 

ब्लॉगिंग 

सध्या ब्लॉगिंगची लोकप्रियता प्रचंड आहे. तुम्हाला जर लिहिण्याची आवड असल्यास ब्लॉगिंगच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची देखील गरज नाही. वेगळे ऑफिस देखील घ्यावे लागत नाही. यासाठी केवळ लॅपटॉप आणि इंटरनेटची गरज असून तुम्ही अगदी घरबसल्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून पैसे कमवू शकता.

तुम्ही स्वतःची न्यूज वेबसाइट सुरू करू शकता. याशिवाय तुम्हाला फॅशन, तंत्रज्ञान, व्यवसाय, शिक्षण अशा विविध क्षेत्राबाबत लिखाण करून पैसे कमवता येतील. या व्यवसायासाठी केवळ वेबसाइट बनवून घ्यावी लागेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचण्यास मदत मिळेल. ब्लॉगिंगसोबतच तुम्ही फ्रिलान्सिंग प्रोजेक्टचे काम करू शकता. विविध भाषांचे ज्ञान असल्यास भाषांतर प्रोजेक्ट पूर्ण करून पैसे कमवता येतील. ब्लॉगिंगच्या कामातून पैशांसोबत तुम्हाला लोकप्रियता देखील मिळेल.

business-ideas-2.jpg
https://www.freepik.com/

युट्यूब चॅनेल 

अनेकांना युट्यूब चॅनेल सुरू करणे हा काही व्यवसाय नाही, असे वाटेल. परंतु, युट्यूबवर चॅनेल उघडून लाखो रुपये कमविणाऱ्या क्रिएटर्सची संख्या मोठी आहे. केवळ भारतामध्ये जवळपास दीड लाख युट्यूब क्रिएटर्स महिन्याला हजारो रुपये कमवत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून व्हीडिओ पाहणाऱ्या युजर्सची सर्वाधिक संख्या भारतात आहे. यावरूनच युट्यूबच्या माध्यमातून किती कमाई होऊ शकते, हे तुमच्या लक्षात येईल. 

ब्लॉगिंग प्रमाणेच युट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणता खर्च येणार नाही. तुमच्याकडे व्हीडिओ रेकॉर्ड करण्यासाठी एक चांगला स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन हवे. तुम्ही चॅनेल सुरू करून त्यावर व्हीडिओ अपलोड करू शकता. 

मात्र, लक्षात घ्या की केवळ एक-दोन व्हीडिओ अपलोड केल्यावर त्वरित पैसे व प्रसिद्धी मिळणार नाही. चॅनेलच्या सबस्क्राइबर्सची संख्या वाढावी यासाठी तुम्हाला अगदी नोकरी व व्यवसायाप्रमाणेच गांभीर्याने काम करावे लागेल. तुमच्या सोशल मीडिया अकाउंट फॉलोअर्सची संख्या जास्त असल्यास याचाही फायदा होऊ शकतो. तुम्ही सोशल मीडियावर स्पॉन्सर्ड पोस्ट शेअर करून पैसे कमवू शकता.

कोचिंग क्लासेस 

काही क्षेत्र असे असतात, जे कोणतीही समस्या आली तरीही कधीही बंद पडत नाही. शिक्षण देखील असेच आहे. त्यामुळे कोचिंग क्लासेस सुरू करणे हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही बालवाडी ते पाचवीपर्यंतच्या मुलांची शिकवणीपासून हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमचे जर इतर विषयात प्राविण्य असल्यास 10वी पर्यंतच्या मुलांना देखील शिकवू शकता. 

तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा ट्यूशन सुरू करता येईल. सध्या होम ट्यूशन देखील लोकप्रिय होत आहे. तुम्ही मुलांच्या घरी जाऊन देखील त्यांना शिकवू शकता. मुलांची संख्या वाढल्यास इतर शिक्षकांची देखील नेमणूक करता येईल.

याशिवाय, ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. कोरोना व्हायरस महामारीनंतर Edutech कंपन्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. तुम्हाला युट्यूबवर शैक्षणिक चॅनेल सुरू करून त्यातून कमाई करता येईल.

business-ideas-3.jpg
https://www.freepik.com/

होम बेकरी

सध्या होम बेकिंगचा ट्रेंड लोकप्रिय होत चालला आहे. तुम्हाला जर बेकिंगची आवड असल्यास यातून पैसे देखील कमवता येतील. लोकांना ताजे व चांगले बेकिंग पदार्थ खायला आवडतात. तुम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना केक व इतर पदार्थ बनवून देऊ शकता.

होम बेकरीच्या व्यवसायासाठी तुम्हाला एकाचवेळी मोठी गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही. जसजसे ऑर्डर मिळतील, तसे तुम्ही सामान आणून पदार्थ बनवू शकता. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून व्यवसाय वाढवू शकता. या व्यवसायातून तुम्हाला तुमची आवड जोपासण्यासोबतच पैसे कमविण्याची देखील संधी मिळते. 

होम कँटिन 

नोकरी व शिक्षणानिमित्ताने इतर शहरांमध्ये राहत असलेल्या लोकांना जेवणाच्या डब्ब्याची गरज असते. तुम्हाला जर चांगला स्वयंपाक बनवता येत असल्यास हा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य ठरेल. कामानिमित्ताने इतर शहरांमध्ये राहिला असलेले अनेकजण हॉटेलमधील जेवणाच्या तुलनेत घरगुती जेवणाला प्राधान्य देतात. अशा लोकापर्यंत तुम्ही पोहचून त्यांना तुमच्या होम कँटिनबद्दल माहिती देऊ शकता. 

या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त गुंतवणुकीचे देखील गरज नाही. घरीच स्वयंपाक बनवून तुम्ही जेवणाचा डब्बा गरजूंपर्यंत पोहचवू शकता व यातून भरपूर कमाई होईल. तसेच कॉलेज, कंपन्यांच्या जवळ छोटेसे कँटिन सुरू केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

डान्स सेंटर 

तुम्हाला जर चांगले नाचता येत असेल तर डान्स सेंटर सुरू करणे हा देखील चांगला व्यवसाय ठरू शकतो. तुम्ही स्वतःच्याच डान्स सेंटरमध्ये कोरियोग्राफर म्हणून काम करू शकता. मात्र, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचे बजेट थोडे जास्त असणे गरजेचे आहे. कारण, यासाठी तुम्हाला जागा भाड्याने घ्यावी लागेल. 

तुम्हाला सुरुवातीला जास्त पैसे गुंतवायचे नसल्यास ऑनलाइन डान्सचे क्लासेस घेऊ शकता. अनेक पालक आपल्या मुलांना डान्स क्लासेस लावतात. त्यामुळे हा व्यवसाय करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. समजा, तुम्हाला डान्स येत नसल्यास तुम्ही इतर डान्स टिचर्सची या कामासाठी नेमणूक करू शकता. 

डान्स सेंटरमध्येच तुम्हाला योगा क्लासेस देखील सुरू करता येईल. सध्या योगा क्लासेसची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी डान्स सेंटर व योगा क्लासेस सुरू करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. 

वेबसाइट डिझाइनिंग

 सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायाची माहिती ऑनलाइन माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असते व यासाठी वेबसाइटची गरज भासते. वेबसाइट ही व्यवसायाबाबत माहिती देणारी प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे वेबसाइट डिझाइनिंगचा व्यवसाय सुरू करणे खूपच फायद्याचे ठरेल. वेबसाइट डिझाइनिंगंच्या व्यवसायात एकदा ग्राहक तुमच्यासाठी जोडला गेल्यास वेबसाइटच्या कामासाठी त्याला पुन्हा पुन्हा मदतीची गरज भासत असते. यामुळे तुम्हाला त्या ग्राहकाकडून वारंवार काम मिळते.

तुम्हाला जर वेबसाइट डिझाइन कशी करायची याचे ज्ञान असल्यास अगदी कमी पैशांमध्ये हा व्यवसाय सुरू करू करता येईल. अगदी 30 हजार ते 50 हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. मात्र, हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला वेबसाइट डिझाइनिंगबाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

तुम्ही वेबसाइट डिझाइनिंगसोबतच डिजिटल मार्केटिंग एजेन्सी देखील सुरू करू शकता. तुम्हाला जर विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मबाबत चांगली माहिती असेल, ग्राफिक डिझाइन, लिहिण्याची आवड असल्यास हा व्यवसाय सुरू करू शकता. केवळ लॅपटॉप व इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. म्हणजेच, या व्यवसायासाठी जास्त गुंतवणुकीची देखील गरज नाही.

business-ideas-4.jpg
https://www.freepik.com/

कपड्यांचे दुकान 

सण असो अथवा एखादा खास दिवस प्रत्येकजण नवीन कपडे खरेदी करतो. घरात कितीही कपडे असले तरीही प्रत्येकाला नवीन कपडे खरेदी करायला आवडतात. त्यामुळे कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. तुम्ही 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करून हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. तुम्हाला प्रिंटेड, कस्टमाइज्ड टी-शर्टची देखील विक्री करता येईल. 

तुम्हाला जर सुरुवातीच्या टप्प्यात दुकान भाड्याने घेण्यासाठी गुंतवणूक करायची नसल्यास ऑनलाइन माध्यमातून देखील हा व्यवसाय चालवता येईल. सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, वेबसाइटच्या माध्यमात ग्राहकांपर्यंत पोहचू शकता. विशेष म्हणजे यामुळे तुम्हाला देशातील कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या ग्राहकांपर्यंत कपड्यांची डिलिव्हरी करता येईल.

रियल एस्टेट एजेंट 

संभाषण कौशल्य चांगले अस्याल रियल एस्टेट एजेंटचा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य असेल. मालमत्ता खरेदी-विक्रीबाबतचे नियम, कायदे माहिती असल्यास रियल एस्टेट एजेंट म्हणून काम करू शकता. या व्यवसायात मालमत्ता भाड्याने देणे, मालमत्ता खरेदी-विक्री करावी लागते. तसेच, ब्रोकर म्हणून काम केल्यास तुम्हाला कमिशन देखील मिळते. अशाप्रकारे, तुम्ही कोणतीही गुंतवणूक न करता या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. 

रियल एस्टेटचा व्यवसाय करणे शक्य नसल्यास इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी देखील सुरू करू शकता. अनेकजण लग्न, वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करतात. मात्र, या समारंभाचे आयोजन करणे थोडे किचकट असते. अशावेळी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरते. तुम्ही वैयक्तीक ते कंपनीपर्यंत अशा वेगवेगळ्या ग्राहकांच्या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करून मोठी कमाई करू शकता.

नवीन व्यवसाय सुरू करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

कोणता व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. ग्राहक क्षमता, स्पर्धक, गुंतवणूक याबाबतची माहिती असणे गरजेचे आहे. याशिवाय, सुरुवातीच्या टप्प्यात कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करणे कधीही फायद्याचे. कारण, यामुळे जोखीम कमी होते. 

तुमच्याकडे व्यवसाय कसा चालवायचा याची ठोस योजना असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही व्यवसायात अगदी सुरुवातीपासून मोठी कमाई होत नाही. त्यामुळे निराश न होता सातत्य ठेवल्यास तुम्हाला भविष्यात व्यवसायात नक्कीच यश मिळू शकते.