टोमॅटोची भाववाढ थांबता थांबत नाहीये. देशात मान्सूनचे आगमन झाल्यापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे आणि त्या तुलनेने मागणी वाढल्यामुळे टोमॅटोच्या किरकोळ दरात चांगलीच भाववाढ पाहायला मिळाली होती. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अजूनही 130-140 रुपये किलो दराने टोमॅटोची किरकोळ विक्री होते आहे. परंतु दिल्लीकरांचे मात्र टोमॅटोच्या भाववाढीने धाबे दणाणले आहे.
दिल्लीत टोमॅटो 300 चा आकडा गाठणार!
दिल्ली आणि एनसीआर परिसरात सध्या टोमॅटोची आवक चांगलीच घटली आहे. त्यामुळे घाऊक भावात वाढ होताना दिसते आहे. नाबार्डच्या सहयोगाने अनुदानित टोमॅटो विक्री करण्याचा सरकारने निर्णय घेतला असला तरी, नाबार्डला देखील टोमॅटो मला उपलब्ध करून देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये किलोवरून सध्या 220 रुपये किलो झाला असून, त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव वाढू शकतात असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
?टोमॅटोची भाववाढ थांबेना! दिल्लीकरांना 300 रुपये किलो दराने खरेदी करावे लागणार टोमॅटो... हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून आवक घटली...#tomatopricehike #DelhiNCR #Tomatoes pic.twitter.com/HmtJ6yVSVX
— Sagar Bhalerao (@SagarMahamoney) August 3, 2023
अतिवृष्टीचा परिणाम!
टोमॅटोची आवक घटण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तरेतील राज्यांमध्ये होणारी अतिवृष्टी. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथून मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि इतर राज्यांना टोमॅटोचा पुरवठा होत असतो. मात्र गेल्या महिना-दोन महिन्यांपासून त्या राज्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे दळणवळणाची व्यवस्था कोलमडली आहे. तसेच शेती पिकांचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. त्यामुळे टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो समवेत इतर हिरव्या पालेभाज्या देखील महागल्या आहेत.
‘मदर डेअरी’ची 259 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री
अशातच दिल्ली-एनसीआर भागात मदर डेअरी आपल्या 'सफल स्टोअर्स'च्या माध्यमातून टोमॅटोची विक्री 259 रुपये किलो दराने करत आहे. नाबार्ड प्रमाणेच मदर डेअरीला देखील टोमॅटो उपलब्ध करून देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांनी देखील टोमॅटोचे भाव वाढवले आहेत. मागच्या आठवड्यात टोमॅटोचे भाव नियंत्रणात येण्याची चिन्हे होती, आता मात्र पुन्हा एकदा टोमॅटोच्या भाववाढीने नागरिकांना हैराण केले आहे.