गेल्या काही महिन्यांपासून देशभरात टोमॅटोचे भाव कमालीचे वाढले आहेत. सामान्य नागरिकांना याचा सर्वात जस्त फटका बसला आहे. गेली 2 महिन्यात टोमॅटोच्या किमती नियंत्रणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु असले तरी किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव कमी होण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीये.
याचाच परिणाम म्हणून मॅकडोनाल्ड आणि सबवेनंतर आता बर्गर किंगने (Burger king) त्यांच्या मेन्यूमधून टोमॅटो काढून टाकले आहे. दिल्ली-एनसीआर परिसरातील आउटलेटमध्ये कंपनीने तशा स्वरूपाचे बोर्ड देखील लावले आहेत. बर्गर किंगने अधिकृतपणे त्यांच्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे. बर्गर किंगने भारतातील त्याच्या अधिकृत वेबसाइटवर "माझ्या बर्गरमध्ये टोमॅटो का नाहीत?" (Why are there no tomatoes in my burgers) नावाने एक नवीन विभाग जोडला असून, त्यात या निर्णयाचे कारण स्पष्ट केले आहे.
भारतात बर्गर किंगची 400 पेक्षा अधिक रेस्टॉरंट आहेत, युवा वर्गाची याला कायम पसंती मिळत आली आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवरील संदेशात 'गुणवत्ता' आणि 'पुरवठा' याबाबत समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांच्या मेन्यूमधून टोमॅटो काढून टाकले जात असल्याचे कारण सांगितले आहे.
का ओढावली समस्या?
मॅकडोनाल्ड आणि सबवेनंतर आता बर्गर किंगने त्यांच्या मेन्यूमधून टोमॅटोला बाद केल्याचे मुख्य कारण म्हणजे टोमॅटोचे वाढलेले भाव. मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत अजूनही कमी झाली नसल्यामुळे दिल्ली परिसरात टोमॅटोचे भाव 250 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
या महिन्याच्या अखेरीस बाजारात टोमॅटोची नवी आवक आली नाही तर टोमॅटोचे भाव 300 रूपये किलोपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नुकतेच नेपाळहून टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला आहे.
गुणवत्ता हा निकष!
टोमॅटोची आवक घटली याचे मुख्य कारण म्हणजे पाऊस. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागांमध्ये टोमॅटोचे उत्पन्न अधिक प्रमाणात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेथे भूस्खलन, पूर या समस्या निर्माण झाल्या आहेत. अर्थात याचा परिणाम पिकावर पाहायला मिळतो आहे. रबी हंगामाचे पिक सध्या बाजारात पोहचू शकले नाहीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची भाववाढ झाली आहे.
सध्या बाजारात जो माल विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याची गुणवत्ता हा देखील एक मुद्दा आहे. टोमॅटोचे पिक हे नाशवंत श्रेणीतील असल्यामुळे खराब हवामान, पावसाचा परिणाम पिकावर बघायला मिळतो आहे. चांगल्या गुणवत्तेचे टोमॅटोत बाजारात उपलब्ध नसल्याने मोठमोठ्या हॉटेल्सने त्यांच्या मेन्यूमधून टोमॅटो हद्दपार केला आहे.
महाराष्ट्रात परिस्थिती काय?
महाराष्ट्रात पुणे, मंचर, नारायणगाव भागात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पन्न घेतले जाते. मात्र इथल्या बाजारपेठांमध्ये देखील टोमॅटोची आवक घटली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बहुतांश खरीपाचे पिक जळून गेल्यामुळे पुढील काही महिन्यात टोमॅटोची आवक वाढण्याची चिन्हे दिसत नाहीये.
सध्या उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अपूर्ण वाढ झालेले, हिरवे आणि कीड लागलेले टोमॅटो देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतात माल खराब होण्यापेक्षा बाजारात येईल त्या भावाने टोमॅटो विक्री करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. हे टोमॅटो 30-40 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध असले तरी किरकोळ बाजारात त्याला मागणी कमी आहे.
हॉटेल व्यावसायिक त्यांच्या पदार्थांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. त्यामुळे खराब आणि कमी गुणवत्ता असलेले टोमॅटो वापरण्याऐवजी ते न वापरण्यावर हॉटेल चालकांचा भर दिसतो आहे.