सध्या संपूर्ण देश टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे हैराण आहे. सध्या देशाच्या अनेक भागात टोमॅटोचे भाव 200 पा पोहोचले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजूनही टोमॅटो 150-170 रुपये किलो दराने विकले जात आहे. टोमॅटोच्या भाववाढीकां प्रश्न संसदेच्या पावसाळी सत्रात देखील गाजला. विरोधी पक्षांनी टोमॅटोच्या वाढत्या किमतीबाबत सरकारला विचारणा केली आणी सर्वसामान्यांना या भाववाढीचा मोठा सामना करावा लागतो आहे याची कल्पना दिली.
यावर उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोच्या नवीन पिकाच्या अधिक पुरवठ्यामुळे किरकोळ किरकोळ किमतीत घसरण होण्याची अपेक्षा आहे. मान्सूनच्या पावसामुळे आणि इतर समस्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव वाढले होते असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
मध्य प्रदेश, महाराष्ट्रात उत्पादन वाढले!
राज्यसभेत टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर चर्चा होत असताना सरकारने यावर अधिक माहिती दिली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे (ashwini kumar choubey) म्हणाले की, महाराष्ट्रातील नाशिक, नारायणगाव आणि औरंगाबाद पट्ट्यातून तसेच मध्य प्रदेशातूनही नवीन पिकाची आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.
बाजारात नव्या पिकाची आवक झाल्यानंतर टोमॅटोचे भाव उतरतील असे त्यांनी म्हटले आहे. तसेच टोमॅटोच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे अधिक पीक घेतले आहे, त्यामुळे देखील अधिक उत्पादन वाढणार आहे असे ते म्हणाले.
टोमॅटोच्या सध्याच्या किमतीत वाढ झाल्याने दिल्ली-एनसीआर भागात नाफेडद्वारे अनुदानित टोमॅटोची विक्री होते आहे. तेथील नागरिकांना 80 रुपये किलोने टोमॅटो खरेदी करता येते आहे. 10-16 जुलैच्या आठवड्यात टोमॅटोची सरासरी दररोजची किरकोळ किंमत दिल्ली, पंजाब, चंदीगड आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 150 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली होती. आता ही भाववाढ कमी होताना दिसते आहे असेही सरकारने म्हटले आहे.