स्मॉल फायनान्स बँका (Small finance bank) आपला एफडी व्याज दर जास्त देतात. यात सध्या दोन बँका आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (SSFB) आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB). या दोन्हा बँकांनी 9 टक्क्यांहून अधिक व्याज दर ऑफर केलाय. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेनं 5 वर्षांसाठी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवरचा मुदत ठेव व्याज दर 9.6 टक्क्यांपर्यंत वाढवलाय. तर नियमित ग्राहकांना बँकेमार्फत 9.1 टक्के व्याज दर दिला जात आहे. हा व्याज दर सरकारी बँकांपेक्षा जास्त आहे.
इतर बँकांच्या तुलनेत अधिक व्याज दर
चांगला व्याज दर देणारी दुसरी बँक म्हणजे युनिटी स्मॉल फायनान्स बँक. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर बँक ज्येष्ठ नागरिकांना 9.5 टक्के व्याज दर देत आहे. तर इतरांसाठी तो 9 टक्क्यांपर्यंत आहे. इतर सरकारी किंवा खासगी बँकांचे मुदत ठेवींवरचे व्याज दर तपासले असता या दोन्ही स्मॉल फायनान्स बँका अधिक चांगला व्याज दर ऑफर करत आहेत. इतर बँकांच्या एफडी व्याज दरावरही एक नजर टाकता येईल. एसबीआय (SBI) 7.6 टक्के, एचडीएफसी बँक (HDFC bank) ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के, अॅक्सिस बँक (Axis Bank) 7.95 टक्के, आयडीएफसी फर्स्ट (IDFC first) बँक 8.25 टक्क्यांपर्यंत व्याज दर दिला जात आहे.
5 लाख रुपयांपर्यंतची हमी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पुढच्या काळात रेपो रेट वाढवले तर देशातल्या बँकादेखील आपल्या मुदत ठेवींवरचे व्याज दर वाढवणार आहे. या माध्यमातून नियमित ग्राहकांना त्यातही ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत चांगल्या दरानं एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झालीय. हमी परतावा हे एफडीचं वैशिष्ट्य आहे. कारण बाजारात सध्या जे काही विविध प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय आहेत, ते जोखीम असलेले पर्याय आहेत. त्या तुलनेत एफडीतली गुंतवणूक हमी असलेली शिवाय सुरक्षित मानली जाते. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी काही बाबी माहीत असणं गरजेचं आहे. आरबीआयच्या डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन नियमाच्या अंतर्गत केवळ 5 लाख रुपयांपर्यंतचीच हमी आहे. म्हणजेच कोणत्याही अडचणीत आपली बँकेतली 5 लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहणार आहे.
एकापेक्षा अधिक एफडी
साधारणपणे 5 लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित असते. याच 5 लाख रुपयांच्या मर्यादेत व्याज आणि मूळ रक्कम यांचा समावेश होत असतो. बँकेच्या काही आर्थिक समस्या निर्माण झाल्यास संबंधित बँकांनी ठेवीदारांना 90 दिवसांच्या आत पैसे परत करणं गरजेचं असतं. सध्याच्या जास्त एफडी दरांचा लाभ घ्यायचा असेल तसंच खात्रीशीर परतावा हवा असल्यास ज्येष्ठ नागरिक आणि नियमित गुंतवणूकदारांना बँकेत केवळ तेवढीच रक्कम गुंतवावी, ज्याचं व्याज 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल. तर जास्तीची रक्कम जमा करण्यासाठी आणि सुरक्षितता मिळण्यासाठी विविध बँकांमध्ये एकापेक्षा अधिक एफडी ग्राहक काढू शकतात.