Financial Literacy: प्रत्येक जण आपापल्यापरीने पैसे कमावण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण पैसे मिळवणे किंवा श्रीमंत होणं हे वाटते तितके सोपे नाही. दैनंदिन खर्चापासून महिन्याची आर्थिक गणितं आणि आपले राहणीमान याचा ताळमेळ घालणे अवघड ठरते. मग यातून मार्ग काढण्यासाठी अनेक जण वेगवेगळे मार्ग अवलंबवतात. जसे की, झटपट पैसे मिळवणाऱ्या योजना, अगदी काही वर्षांत पैसे दुप्पट करून देणाऱ्या स्कीम, तसेच एखाद्या वेळेस लॉटरी काढून झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत असतात. पण याऐवजी आपणच स्वत:ला काही चांगल्या आर्थिक सवयी लावल्या तर यातून नक्कीच तुमचे पैसे वाचतील, आर्थिक भरभराट होईल आणि तुम्हाला गुंतवणूक करण्याची चांगली सवय लागेल. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही चांगल्या आर्थिक सवयी ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल.
Table of contents [Show]
आर्थिक उद्दिष्ट निश्चित करा
जीवनाचे आर्थिक उद्दिष्ट निश्चित करणे खूप गरजेचे आहे. कारण प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे. चांगले जीवन जगायचे आहे. पण त्यासाठी लागणारी मेहनत आणि शिस्त नको हवी असते. त्यामुळे तुम्ही जर तुमचे उद्दिष्ट निश्चित केले असेल तर ते साध्य करण्याकरिता तुमच्याकडे त्याचा पुढचा टप्पा म्हणून त्याचे नियोजन असणे गरजेचे आहे. तुम्ही पैसे किती आणि कसे वाचावणार आहात. ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कधीपासून सुरूवात करणार? याचे तुमच्याकडे मायक्रो लेव्हलवर नियोजन असेल तर तुम्ही तुमचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करू शकता.
कॅशने खरेदी करण्याची सवय ठेवा
खरेदी करताना नेहमी कॅश स्वत:सोबत ठेवा. कारण सध्याच्या काळात डिजिटल पेमेंटमुळे रोख रक्कम बरेच जण बाळगत नाही. ते पूर्णपणे ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून राहतात. पण इंटरनेट किंवा इतर कारणांमुळे या सेवा वापरता नाही आल्या तर तुमची कोंडी होऊ शकते. तसेच सतत ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून राहिल्यामुळे खर्चाचा अंदाज येत नाही. बॅंक खात्यातून किती पैसे कट होतात, हे कळत नाही. काही वेळेस डिजिटल पेमेंटमुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोख रक्कम देऊन खरेदी करण्याची सवय ठेवल्यास आपोआप तुमच्या पैशांची बचत होईल.
आर्थिक स्थिती पाहून खर्च करा
आपल्या भाषेमध्ये पैसे खर्च करण्याबाबत एक छान म्हण आहे; ती म्हणजे 'अंथरूण पाहून पाय पसरावे' म्हणजे आपली जेवढी ऐपत आहे. त्याच पद्धतीने खर्च करावा. उगीच इतरांना दाखवण्यासाठी किंवा उधार किंवा कर्ज काढून पैसे खर्च करू नयेत. अंथरूण पाहून पाय पसरल्याने, तुमचा खर्च आपोआप आटोक्यात येण्यास मदत होईल. आणि तुम्ही स्वत:ला आर्थिक सुरक्षित समजू शकाल.
नियोजनबद्ध गुंतवणूक करा
गुंतवणूक आणि नियोजनबद्ध गुंतवणूक यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कारण गुंतवणूक म्हणून कोठेही केलेली गुंतवणूक ही तुम्हाला निश्चितपणे फायदा मिळवून देईल असे नाही. यासाठी तुमच्याकडे त्याचे नियोजन असायला हवे. पैसे गुंतवताना ते वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवले पाहिजेत. त्याच्यातून मिळणारा परतावा वेळोवेळी तपासला पाहिजे. भविष्याचा अंदाज घेताना त्यात येणाऱ्या अडचणी, वाढती महागाई अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे. घरातील मासिक खर्च भागवण्याबरोबच हेल्थ इन्शुरन्स, पेन्शन स्कीम याचेही नियोजन करणे गरजेचे आहे.
कर्जाचा योग्य वापर करा
कर्ज (Loan) मिळत आहे; म्हणून त्याचा नेहमी वापर करणे योग्य नाही. आवश्यकता असेल तरच कर्ज घ्यावे. उदाहरणार्थ, घर किंवा प्रॉपर्टी किंवा व्यवसाय करण्यासाठी कर्जाचा वापर करावा. कारण कर्जावर आपण जे व्याज भरतो. ते खूप असते आणि त्याचे कर्जदारावर मानसिक दडपण सुद्धा असते. त्यामुळे किरकोळ गोष्टींसाठी कर्ज घेऊ नये.
ब्रॅण्डसाठी आर्थिक ओढाताण करू नका!
अनेकांना ब्रॅण्डेड वस्तुंचे खूप आकर्षण असते. यासाठी ते वाट्टेल ती किंमत मोजण्यासाठी तयार असतात. त्यांची अशी धारणा असते की, ज्या गोष्टी महाग आहेत; त्याच बेस्ट असतात. पण अनेकवेळा अशा काही वस्तू असतात. ज्या विनाकारण महाग विकल्या जातात. त्याची तुलना न करता किंवा इतर ठिकाणी ती वस्तू कितीला मिळते याची खातरजमा न करता ती विकत घेतली जाते. त्यामुळे फक्त ब्रॅण्डचा टॅग लावून महाग गोष्टी विकत घेऊ नका. कोणतीही वस्तू विकत घेण्यापूर्वी त्याचे वेगवेगळे पर्याय तपासून घ्या.
आर्थिक शिस्त आणि चांगल्या आर्थिक सवयी यामुळे तुमच्या पैशांची नक्कीच बचत होऊ शकते. या बचतीतुन तुम्ही चांगली गुंतवणूक सुरू करू शकता. यामुळे तुम्हाला जर तुमची आर्थिक भरभराट व्हावी असे वाटत असेल तर वर दिलेल्या सवयींचा अंगिकारणे तुमच्या फायद्याचे ठरू शकेल.