औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. (Tender scam) एकाच लॅपटॉपवरुन टेंडर भरण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या (Aurangabad News) तक्रारीवरुन याप्रकरणी तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात औरंगाबादच्या सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून महापालिकेची फसवणूक केल्याचा या सर्वांवर आरोप आहे.
तब्बल चार हजार कोटींच्या या प्रकल्पांतर्गत 40 हजार घरांसाठी हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची 128 हेक्टर जमीन उपलब्ध करुन दिली होती. केंद्र सरकारकडून या घोटाळ्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. समरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस अशी या तीन कंपन्यांची नाव आहेत. या कंपन्यांचे मालक आणि जॉईंट व्हेंचर विरोधात फसवणुकीसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच लॅपटॉपवरून ही निविदा चारही कंपन्यांनी अपलोड केल्याचे समोर आले.
असा उघडकीस आला घोटाळा
मनपा प्रशासक डॉ. चौधरी यांनी निविदेचा बारकाईने अभ्यास केल्यावर ही निविदा एकाच आयपी अँड्रेसवरुन भरल्याचे समोर आले. एकाच लॅपटॉपवरून ही निविदा चारही कंपन्यांनी अपलोड केले आहे. हा संपूर्ण टेंडर घोटाळा उघडकीस येताच गुरुवारी रात्री मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या ई-निविदेत फसवणूक करणाऱ्या कंपनीसह तीन कंपन्यांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
ईडी करणार चौकशी
याप्रकरणात आता ईडीचीही एन्ट्री झाली आहे. याप्रकरणी योजनेची संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली आहेत. त्याचप्रमाणे एकाच आयपी ॲड्रेस वरून निविदा दाखल करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात येत आहे. या कंपनीने औरंगाबादप्रमाणेच राज्यातील किमान सहा ते सात शहरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेची कामे घेतली आहेत. याबाबत आता ईडी चौकशी करणार आहे.