भारत हा खरं तर चहाचा (Tea) चाहता देश आहे. चहाची मोठी उलाढाल भारतात होत असते. कॉफीही (Coffee) लोकप्रिय आहे. मात्र चहाच्या तुलनेत ती कमीच दिसून येते. आता मात्र जी आकडेवारी समोर येतेय, त्यावरून कॉफीप्रेमींची संख्या वाढत असल्याचं दिसून येतंय. टाटा स्टारबक्सनं 2022-23 या कालावधीत तब्बल 1087 कोटी रुपयांची कमाई केलीय. मागच्या आर्थिक वर्षाच्या 635.7 कोटी रुपयांच्या तुलनेत ती जवळपास 71 टक्क्यांनी वाढलीय. आर्थिक वर्षात किरकोळ विक्री केंद्रांच्या संख्येत वाढ झाल्यानं व्यवसायही वाढल्याचं नोंदवण्यात आलंय. पुढे या तिमाहीत स्टारबक्सचा (Starbucks) महसूल वर्षभरात 48 टक्क्यांनी वाढला.
Table of contents [Show]
आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक स्टोअर्स
टाटा कन्झ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (Tata Consumer Products Limited) आणि स्टारबक्स कॉर्पोरेशन (Starbucks corporation) यांच्या भागीदारीत किंवा संयुक्त उपक्रमानं कॉफीशॉपचा हा व्यवसाय सुरू आहे. याअंतर्गत सध्या 333 स्टोअर्स आहेत. यात कंपनीनं आर्थिक वर्ष 2023मध्ये 71 नवे आउटलेट्स जोडले आहेत. आर्थिक वर्ष 23च्या चौथ्या तिमाहीत यात 22 नवीन आउटलेट्स समाविष्ट आहेत. या वर्षभरात 15 नव्या शहरांमध्ये व्यवसाय सुरू झाला. यानिमित्तानं आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक स्टोअर्स उघडण्यात आलीत.
Tata Starbucks registered 71% growth, a landmark year for business, as we reached four-digit in the top line: Official. pic.twitter.com/ey1HuqvI8y
— Marketing Maverick (@MarketingMvrick) April 25, 2023
बाजारातलं स्थान मजबूत करण्यावर भर
टाटा स्टारबक्सनं 4 अंकी टॉपलाइन गाठून आपली वार्षिक स्टोअर उघडण्याची सर्वाधिक संख्या गाठून बाजारात एक मजबूत कामगिरी नोंदवली. बाजारातलं आपलं स्थान अधिक वरच्या स्तरावर नेण्याचा टाटा स्टारबक्सचा प्रयत्न आहे. हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही अधिक ग्राहकाभिमुख होण्याचा प्रयत्न त्याचप्रमाणं स्टोअर संख्या वाढवण्याचा विचार करत आहोत, असं टाटा कन्झ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिडेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डिसोझा म्हणाले.
पायलट स्टोअर्समुळे दिशा
आपली ही कमाईची आकडेवारी सादर करताना टाटा कन्झ्यूमर प्रॉडक्ट्सनं सांगितलं, की अधिकाधिक ग्राहकांना आपल्या प्रॉडक्टकडे आकर्षित करण्यासाठी मागच्या वर्षी (2022) जवळपास 4 शहरांमध्ये पायलट स्टोअर्स चालवले. या पायलट स्टोअर्सनं अधिक चांगले ऑपरेटिंग मेट्रिक्स दाखवले. यामुळे हीच कार्यपद्धती आम्ही 2023मध्ये राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरीकडे, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सनं आपल्या लॉयल्टी प्रोग्रामबद्दलही सांगितलं. माय स्टारबक्स रिवॉर्ड्स प्रोग्रामनं 2.3 दशलक्षचा टप्पा ओलांडलाय. ही वर्षभरातली 100 टक्के वाढ आहे. टाटा कंझ्युमर आणि स्टारबक्स कॉर्पोरेशननं ऑक्टोबर 2012मध्ये 50:50चा हा संयुक्त उपक्रम स्थापन केला.
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
टाटा कन्झ्यूमर प्रॉडक्ट्सनं नुकतीच आपली कमाई जाहीर केली. मार्च तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 289.56 कोटी रुपये नोंदवलाय. मागच्या वर्षीच्या याच तिमाहीत हा नफा 239.05 कोटी रुपये होता. त्यामुळे तुलना केल्यास यावर्षी तो 21.1 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून येतंय. समूहाचे कामकाजातून उत्पन्न 3618.73 कोटी रुपये इतकं होतं. आम्ही आमच्या संपूर्ण व्यवसायात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन एम्बेड करत आहोत. याचा उपयोग नवीन उत्पादन विकास, खरेदी आणि महसूल वाढ व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात निर्णय घेण्यास होणार आहे, असं सुनील डिसुझा म्हणाले.