टाटा ग्रुपने मिनरल वॉटर उद्योगावर लक्ष केंद्रीत केले आहे. हिमालयन, टाटा कॉपर आणि टाटा ग्लुको या तीन ब्रॅंडसह मिनरल वॉटर बिझनेसमध्ये विस्तार करणाऱ्या टाटा ग्रुप आता थेट बिसलेरी या ब्रॅंडच्या खरेदीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बिसलेरी इंटरनॅशनलच्या खरेदी-विक्रीसाठी दोन्ही बाजूने चर्चा झाली असून हा व्यवहार अंतिम टप्प्यात असल्याचे बिसलेरीचे प्रमुख रमेश चौहान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या डीलवर शिक्कामोर्तब झाले तर टाटा कन्झुमर प्रॉडक्ट्स मिनरल वॉटर बिझनेसमधील सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे.
टाटा समूहातील टाटा कन्झुमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (Tata Consumer Products Limited-TPCL) आणि बिसलेरी इंटरनॅशनल (Bisleri International) या दोन्ही कंपन्यांमध्ये सप्टेंबर 2022 या महिन्यात प्राथमिक चर्चा झाली होती. आता हा व्यवहार अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. बिसलेरीसाठी टाटांकडून 6000 ते 7000 कोटींचे डील फायनल होण्याची शक्यता आहे. या डीलबाबत बिसलेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या डीलबद्दल माहिती दिल्याने माध्यमांमध्ये आज ही बातमी प्रकाशझोतात आली.
मागील अनेक वर्षांपासून मिनरल वॉटर मार्केटमध्ये बिसलेरी ब्रॅंडचे वर्चस्व आहे. बिसलेरीने एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. बिसलेरीला स्पर्धा देण्यासाठी कोको कोला, पेप्सिको, पार्ले अॅग्रो, भारतीय रेल्वे, माणिकचंद ग्रुप, यांनी मिनरल वॉटरचे ब्रॅंड बाजारात आणले, मात्र बिसलेरीपुढे या ब्रॅंडचा निभाव लागला नाही. यामुळेच टाटा समूहाने बिसलेरीच्या खरेदीसाठी प्रयत्न केले आहेत. एफएमसीजी उद्योगातील आघाडीची कंपनी बनण्याच्या दृष्टीने भविष्यात विस्तार आणि नव्या कंपन्यांचे अधिग्रहण, गुंतवणूक याला प्राधान्य दिले जाईल, असे टाटा टाटा कन्झुमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने आपल्या वार्षिक अहवालात म्हटल आहे.
मिनिरल वॉटरची बाजारपेठ 20 हजार कोटींच्या आसपास आहे. यात बिसलेरी ब्रॅंडचे वर्चस्व असून 32% हिस्सा आहे. मात्र जवळपास 60% मार्केट शेअर असंघटित क्षेत्रातील छोट्यामोठ्या कंपनी आहेत. बिसलेरीचे 122 प्लांट असून त्यात 4500 वितरक आहेत. बिसलेरीला यंदा 2500 कोटींचा महसूल अपेक्षित आहे. चौहान यांच्या वारसांना हा बिझनेस पुढे सुरु ठेवण्याची इच्छा नाही. त्याशिवाय वयोमानामुळे पुढे व्यवसाय सुरु ठेवणे कठिण असल्याने कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे 82 वर्षीय चौहान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कोण आहेत रमेश चौहान
बिसलेरी इंटरनॅशनल या कंपनीचे चेअरमन असलेल्या रमेश चौहान यांनी कोल्ड्रींक्समधील अनेक ब्रॅंड नावारुपाला आणले आहेत. बिसलेरी इंटरनॅशनलमध्ये मिनरल वॉटर शिवाय फोन्झो, स्पाईसी, लिमोनाटा, पिनाकोलाडा ही शीतपेयं बाजारात आणली. बिसलेरीपूर्वी रमेश चौहान यांनी थम्सअप, गोल्डस्पॉट,माझा, लिम्का हे ब्रॅंड विकसित केले. पुढे 1993 मध्ये कोका कोला कंपनीने हे सर्व ब्रॅंड विकत घेतले.