• 02 Oct, 2022 08:30

Tata Motorsच्या गाड्या 1 जुलैपासून महागणार!

tata-motors-to-go-up-from-july-1

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक गाड्यांच्या किमती 1 जुलैपासून 1.5 ते 2.5 टक्क्यांनी वाढणार आहेत.

टाटा मोटर्स कंपनीच्या व्यावसायिक गाड्यांच्या किमती 1 जुलैपासून वाढवल्या जाणार आहेत. या व्यावसायिक गाड्यांच्या किमती 1.5 ते 2.5 टक्क्यांनी वाढवल्या जाणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दि. 28 जून रोजी दिली.

कंपनीने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्यावसायिक वाहनांवरील दरवाढ ही 1.5 ते 2.5 टक्के या दरम्यान होणार असून, 1 जुलै, 2022 पासून कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेलनुसार किमत वाढवली जाणार आहे. जागतिक बाजारपेठेत स्टील, अल्युमिनिअम आणि इतर धातुंच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच इतर कच्च्या मालांच्या किमतीमध्येही वाढ झाल्याने व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

यापूर्वी एप्रिल महिन्यात सुद्धा टाटा मोटर्सने आपल्या नियमित वाहनांच्या किमती 1.1 टक्के आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. वाढत्या महागाईनुसार आणि उत्पादन खर्चाच्या प्रमाणानुसार गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीच्या व्यावसायिक गाड्यांची विक्री मे महिन्यात वाढून 31,414 युनीट झाली होती. जी मागील वर्षी 9,371 युनीट होती. या मे महिन्यात कंपनीची एकूण विक्री 3 पटीने वाढून 76,210 युनीट झाली होती. तर कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मे, 2021 मध्ये कंपनीच्या गाड्यांची एकूण विक्री 26,661 युनीट झाली होती. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर लक्ष्य केंद्रीत करत टाटा मोटर्सने मागील महिन्यात आपल्या Ace Compact ट्रकच्या इलेक्ट्रिक आवृत्ती लॉण्च केली होती. टाटा समुहातील टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी ही चार चाकी, व्यावसायिक वाहनं, पिक-अप, ट्रक आणि बस यांची निर्मिती करणारी ग्लोबल कंपनी आहे.

image source- https://bit.ly/3AebnNx