Swiggy Credit Card: ऑनलाइन फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरी कंपनी स्वीगीने ग्राहकांसाठी खास क्रेडिट कार्ड आणले आहे. या कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना जास्त डिस्काउंट मिळेल. एचडीएफसी बँकेसोबत मिळून स्वीगीने को-ब्रँडेड कार्ड लाँच केले आहे. मागील काही दिवसांपासून को-ब्रँडेड कार्ड लाँच करण्याचा इ-कॉमर्स कंपन्यांमध्ये ट्रेंड आला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून असे पाऊल उचलले जात आहे.
स्वीगी क्रेडिट कार्ड धारकांना खरेदीवर फ्लॅट डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतील. तसेच क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स वेळोवेळी आणण्यात येतील, असे स्वीगीने म्हटले आहे. मागील महिन्यात कोटक महिंद्रा बँकेसोबत पार्टनरशीप करत मिंत्राने क्रेडिट कार्ड लाँच केले. तर फ्लिपकार्टने अॅक्सिस बँकेसोबत पार्टनरशीप करत क्रेडिट कार्ड लाँच केले.
किती डिस्काउंट मिळणार?
स्वीगीने लाँच केलेल्या क्रेडिट कार्डवरून फूड ऑर्डर किंवा किराणा मालाची खरेदी केली तर 10% कॅशबॅक मिळेल. (Swiggy Credit Card) तसेच हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तरी ही ऑफर लागू असेल. सोबतच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, ओला नायका वर शॉपिंग केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. नाइके, आदिदास, झारा, एच अँड एम अशा ब्रँडेड स्टोअरमधील खरेदीवरही डिस्काउंट मिळेल. कार्डधारकांना स्वीगी मनीच्या स्वरुपात कॅशबॅक मिळेल. अॅपवरून इतर कोणतेही व्यवहार करताना हा कॅशबॅक डिस्काउंट वापरता येईल.
सध्या शॉपिंग करताना ग्राहक कॅशबॅक आणि ऑफर्स कायम शोधत असतात. हे लक्षात घेऊन आम्ही एचडीएफसी सोबत मिळून क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. त्यामुळे ग्राहकांची शॉपिंग अधिक आनंददायी आणि सुलभ होईल, असे स्वीगीचे चिफ फायनान्शिअल ऑफिसर राहुल बोथरा यांनी म्हटले.
प्रतिस्पर्धी झोमॅटोची क्रेडिट कार्डमधून माघार
दरम्यान, स्वीगीची प्रमुख प्रतिस्पर्धी झोमॅटोने क्रो-ब्रँडेड कार्डमधून माघार घेतली आहे. 2020 साली झोमॅटोने आरबीएल बँकेसोबत सहकार्य करत क्रेडिट कार्ड लाँच केले होते. चालू वर्षी एप्रिलमध्ये कार्डची सेवा बंद केली.
स्वीगीची नव्या व्यवसायात उडी
फूड डिलिव्हरी हा स्वीगीचा मुख्य व्यवसाय आहे. यासोबत आता स्वीगी क्विक कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. बंगळुरू मध्ये कंपनीने पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. याअंतर्गत स्वीगी स्थानिक दुकानदारांना स्वीगीवर आणू इच्छित आहे. लोकल इलेक्ट्रिक स्टोअर, कपडे, बेबी केअर प्रोडक्ट्स अशी दुकाने थेट स्वीगीशी जोडली जातील. ग्राहकांना स्थानिक दुकानातून या वस्तूंची ऑर्डर करता येईल. या नव्या सेवेचे नाव स्वीगीने ‘Maxx’ असे ठेवले आहे.