राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळातर्फे महिलांना उद्योग उभारणीसाठी मदत करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. स्वर्णिमा (Swarnima Scheme for Womens) ही योजना खास इतर मागासवर्ग गटातील महिला लाभार्थ्यांसाठी आहे. महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कर्ज उभे करण्यात अनेक अडचणी येतात. अनेक महिलांचे बँक खातेही नसते. त्यामुळे छोटा का असेना परंतु उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे महामंडळाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
अल्प दराने कर्जपुरवठा
या योजनेद्वारे लाभार्थ्याला महामंडळातर्फे अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. महामंडाळाच्या जिल्हा कार्यालयात यासाठी अर्ज करावा लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही अटींची पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदार इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारण रहिवासी असावा. महिला लाभार्थ्याचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे. संपूर्ण कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये व शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रकल्पाची मर्यादा 75 हजारापर्यंत असावी. लाभार्थ्याला 5 टक्के व्याज दराने 7 वर्षाच्या कालवधीसाठी कर्ज दिले जाते.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे - - उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र.
- जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रत, अर्जदाराचा फोटो.
- व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा आणि 7/12 चा उतारा.
- शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
- दोन जामीनदारांची प्रमाणपत्रे.
- स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या कामासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्यासाठीच कर्जाचा वापर करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र.
- तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक परवाने / लायसन्स.
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक
https://msobcfdc.in/ या संकेतस्थळावर योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.