15 जून 2001 रोजी म्हणजेच 22 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर ‘गदर- एक प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिकेतील हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटाचा सिक्वेल येत्या 9 जून रोजी रिलीज होणार आहे. यानिमित्ताने या चित्रपटाचे चाहते आतुरतेने ‘गदर-2’ (Gadar 2: The Katha Continues) या चित्रपटाची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मात्र ‘गदर-2’ चा ट्रेलर प्रदर्शित न करता, जुन्या ‘गदर- एक प्रेमकथा’चा ट्रेलर नव्याने रिलीज केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये नेमके काय असेल याची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
पाकिस्तानी महिलेच्या (अमिषा पटेल) प्रेमात पडलेल्या देशभक्त भारतीय तरुणाची (सनी देओल) ही कहाणी सांगणारा हा चित्रपट आजही सिनेरसिकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटामुळे भारतात काही ठिकाणी दोन समुदायात दंगली देखील घडल्या परंतु या चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही. या चित्रपटातील काही संवाद तर आज 22 वर्षानंतरही भारतीयांच्या ओठावर आहेत. “अशरफ अली, हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा” हा यापैकी एक संवाद. या चित्रपटाची गाणी देखील देशविदेशात चांगलीच गाजली होती. या सगळ्यांचा परिणाम म्हणून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड तोडत, कोरोडो रुपयांची कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला होता.
2001 मध्ये अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर- एक प्रेम कथा' या चित्रपटाने भारतात आणि भारताबाहेर एकूण 265 कोटींची कमाई केली होती. केवळ भारतातच या चित्रपटाने सुमारे 75 कोटींची कमाई केली होती. महागाई आणि अन्य गोष्टींचा विचार करता आजच्या काळात हा आकडा जवळपास 5 हजार कोटींच्या घरात आहे. याचाच अर्थ बाहुबली-2 आणि अन्य चित्रपटांच्या कमाईच्या तुलनेत ‘गदर’ने बक्कळ कमाई केली होती. 19 कोटींचा निर्मिती खर्च या चित्रपटासाठी आला होता.
तिकीटाची किंमत होती केवळ 25 रुपये
15 जून 2001 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकाच दिवसांत या चित्रपटाने 1.40 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यावेळी तिकिटाचे सर्वसाधारण दर केवळ 25 रुपये इतके होते. या चित्रपटासाठी लोकांनी सिनेमागृहात एकच गर्दी केली होती. सिनेमाचे तिकीट ब्लॅकने 100 रुपयांपर्यत विकली जात होती असे काही सिनेरसिक सांगतात.
‘लगान’ला दिली होती जोरदार टक्कर
आशितोष गोवारीकर दिग्दर्शित आणि आमीर खानच्या मुख्य भूमिकेतील ‘लगान’ आणि ‘गदर’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले होते. लगान हा एक वेगळ्या धाटणीचा आणि कथानक घेऊन आलेला चित्रपट होता. पुढे तो ऑस्करला देखील गेला मात्र बॉक्स ऑफिसवर ‘गदर’च वरचढ राहिला.भारतात ‘लगान’ ने 34.30 कोटींचा गल्ला जमवला तर ‘गदर’ने 75 कोटींची कमाई केली होती.