पावसाळा सुरु झाला आणि देशभरात महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या पालेभाज्या, कांदे, बटाटे यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच आता डाळी आणि कडधान्ये देखील महाग झाले आहेत. काल रिझर्व बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या बुलेटीनमध्ये या वाढत्या महागाईचा परिणाम चलनवाढीवर होऊ शकतो असे भाकीत केले आहे. महागाई आटोक्यात यावी आणि सामान्य नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी आता केंद्र सरकारने देखील कंबर कसली आहे.
वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी अनुदानित चणा डाळ विक्रीसाठी उपलब्ध उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. या विक्रीचा शुभारंभ काल करण्यात आला.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चनाडाळची विक्री 'भारत डाळ' या ब्रँड नावाने सुरू करण्यात आली आहे. हा भारत सरकारद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या चणा डाळीचे नाव आहे. 60 रुपये किलो दराने ही डाळ ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तसेच 30 किलोपेक्षा जास्त डाळीची खरेदी केल्यास ग्राहकांना 55 रुपये दराने ही डाळ मिळणार आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या ‘भारत डाळ’ ही अनुदानित चणा डाळ दिल्ली-एनसीआरमधील राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या (NAFED) किरकोळ दुकानांमधून विकली जात आहे. ज्या राज्यांमध्ये चणा डाळीचा पुरवठा कमी असेल त्या राज्यांमध्ये नाफेडद्वारे ‘भारत डाळ’ची विक्री केली जाणार आहे. केंद्र सरकारकडे सध्या चण्याचा (हरबरा) भरपूर साठा आहे. चण्याचे डाळीत रुपांतर करून ती सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. डाळीचे वितरण, पॅकेजिंग व्यवस्था ही नाफेडद्वारे केली जात आहे.
याआधी टोमॅटोची देखील विक्री
चणा डाळीच्या आधी केंद्र सरकारने अनुदानित टोमॅटोची देखील विक्री सुरु केली आहे. टोमॅटोचे वाढते भाव लक्षात घेता दिल्लीसाह देशातील प्रमुख शहरांमध्ये नाफेडद्वारे 80 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे. टोमॅटोनंतर आता चणा डाळ विक्रीसाठी आल्यामुळे सामान्य ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. किरकोळ बाजारात सध्या टोमॅटो 150-200 रूपये किलो दराने विकला जात असून, चणा डाळ 70-100 रुपये किलो दराने विकली जात आहे.