आर्थिक अनागोंदींमुळे मागील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या जेट एअरवेजसमोरील मोठी अडचण दूर झाली आहे. जेट एअरवेजला 100 कोटींचे तातडीचे अर्थसहाय्य मिळाले आहे. जालान कालरॉक कन्सोशिर्अम या गुंतवणूकदार कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या अर्थसहाय्यामुळे जेट एअरवेज 2024 पासून पुन्हा टेकऑफ घेण्याची शक्यता आहे.
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी मनी लॉंडरिंग करुन कंपनीचा पैसा इतरत्र वापरला. यामुळे जेट एअरवेज आर्थिक संकटात सापडली. इंधन कंपन्या, विमानतळ प्राधिकरण यांची देणी थकवल्याने या सेवा बंद झाल्या. 17 एप्रिल 2019 पासून जेट एअरवेजची विमाने जमिनीवर आहेत.
जेट एअरवेजला पुनरुज्जिवीत करण्यासाठी जालान कालरॉक कन्सोर्शिअम कंपनीला अधिकार प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत जालान कालरॉकने जेट एअरवेजमध्ये 350 कोटींची गुंतवणूक केली आहे. या पुनरुज्जीवन आराखड्यानुसार 30 सप्टेंबर 2023 पर्यंत जालान कालरॉक कन्सोर्शिअमने 350 कोटींची गुंतवणूक करण्याचा शब्द पाळला.
जालान कालरॉकला जेट एअरवेजवर संपूर्ण नियंत्रण मिळवायचे आहे. त्यानंतर कंपनी पुन्हा सुरु करण्यासाठी टप्प्याटप्यात बदल केले जाणार आहेत. जालान कालरॉक कन्सोर्शिअमध्ये यूएईमधील मुरारी लाल जालान हे उद्योजक आणि युकेमधील कालरॉक कॅपिटल या कंपनीचा समावेश आहे.
वर्षअखेर टप्प्याटप्यात गुंतवणूक हिस्सा वाढवून जालान कालरॉक कन्सोर्शिअम जेट एअरवेजवर संपूर्ण मालकी मिळवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बँकांना त्यादृष्टीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे जालान कालरॉककडून सांगण्यात आले आहे.
जेट एअरवेजकडे विमानांचा ताफा आहे. त्याशिवाय नव्याने विमाने खरेदी करण्यासाठी जालाना कालरॉक कन्सोर्शिअमकडून लवकरच विमान तयार करणाऱ्या बड्या कंपन्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. जेट एअरवेजला पायलट्सची कमी भासू नये म्हणून पायलट्स ट्रेनिंग इन्स्टीट्युटसोबत चर्चा होणार आहे.