देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना झटका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरवाढीचा सपाटा कायम ठेवल्यानंतर एसबीआयने कर्जदरात वाढ केली आहे. एसबीआयने सर्वच मुदतीच्या कर्जाचा दर 0.10% ने वाढवला असून नवीन कर्जदर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाला आहे. कर्जदर वाढल्याने गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जांसह सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहेत. विशेषत: दिर्घ मुदतचे कर्ज घेतलेल्या होम लोन कर्जदारांना वाढलेला मासिक हप्ता (EMI) भरण्यासाठी जादा पैशांची तजवीज करावी लागेल.
'एसबीआय'च्या वेबसाईटनुसार एक दिवसाचा MCLR व्याजदर 0.10% वाढला असून तो 7.95% इतका झाला आहे. एक महिन्यासाठीचा कर्जाचा दर आता 8.10% इतका वाढला आहे. यापूर्वी तो 8% इतका होता. तीन महिने मुदतीचा एमसीएलआर दर 8.10% इतका असल्याचे बँकेने म्हटले आहे. सहा महिने मुदतीचा कर्जाचा दर 8.30% वरुन 8.40% इतका वाढवण्यात आला आहे.
एक वर्ष मुदतीच्या कर्जांसाठीचा व्याजदर आता 8.50% इतका वाढवण्यात आला आहे. त्यात 0.10% इतकी वाढ झाली. यापूर्वी तो 8.40% इतका होता. दोन वर्षांसाठी तो 8.60% आणि तीन वर्षांसाठी कर्जाचा दर 8.70% इतका व्याजदर असेल, असे बँकेने म्हटले आहे.
Table of contents [Show]
सलग दुसऱ्या महिन्यात एसबीआयने व्याजदर वाढवला
भारतीय स्टेट बँकेने सलग दुसऱ्या महिन्यात कर्जदरात वाढ केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात एसबीआयने एमसीएलआर कर्जदरात 0.10% वाढ केली होती. आता आरबीआय पतधोरणानंतर एसबीआयने पुन्हा एकदा ग्राहकांना झटका दिला आहे.
'एसबीआय' व्याजदर वाढीचा कोणाला फटका बसणार
बँकेने एमसीएलआर वाढवल्यानं बदलत्या व्याजदरानुसार कर्ज घेतलेल्या कर्जदारांचा ईएमआय वाढणार आहे. पर्सनल लोन, गृह कर्ज, वाहन कर्ज अशा प्रकारची कर्जे शक्यतो बदलत्या व्याजदराने मंजूर केली जातात. काही कर्जे ही फिक्स्ड इंटरेस्ट रेटने दिली जातात. अशा कर्जांवर फारसा परिणाम होत नाही. या कर्जाचे ईएमआय मुदतपूर्तीपर्यंत शक्यतो स्थिर असतो.
MCLR व्याजदर म्हणजे काय?
- एप्रिल 2016 पासून रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर निश्चितीसाठी नवी पद्धत लागू केली. त्यानंतर बॅंकांकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स अर्थात "एमसीएलआर" निश्चित केला जाऊ लागला.
- एमसीएलआर नव्या कर्जदारांना लागू होत असला तरी जे कर्ज फेडत आहेत, अशा कर्जदारांनाही बेस रेट ऐवजी एमसीएलआरमध्ये कर्ज बदलून घेण्याचा पर्याय आहे. यासाठी त्यांना स्वीच करण्यासाठीचे शुल्क भरावे लागेल.
- एमसीएलआर व्याजदराचा दरमहा आढावा घ्यावा लागतो. एमसीएलआर हा केवळ बॅंकांना बंधनकारक आहे. त्यामुळे बिगर बॅंक वित्त संस्थांना (एनबीएफसी) तो लागू होत नाही.
- सर्वसाधारणपणे एमसीएलआर आणि बेस रेटमध्ये किमान 0.25 टक्क्याचा फरक असतो. त्यामुळे बॅंकांसुद्धा कर्जदारांना एमसीएलआरचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करतात.
- कर्ज घेणाऱ्या प्रत्येकाने व्याजदर, प्रक्रीया शुल्क, मासिक हप्ते याबरोबरच करारच्या अटी आणि शर्थी बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे.
RBI ने रेपो दरात केली होती वाढ
रिझर्व्ह बँकेची चालू आर्थिक वर्षातील शेवटची पतधोरण बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. आरबीआयने 8 फेब्रुवारी 2023 रोजी पतधोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% ची वाढ करुन तो 6.50% इतका वाढवला होता. महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढीचा उपाय सुरुच ठेवणार असल्याचे सूतोवाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी दिले होते. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीचे अनुकरण इतर बँकांकडून देखील केले जाणार असून त्याची सुरुवात एसबीआयने केली.