रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीचे सत्र कायम ठेवत आज सर्वसामान्यांना झटका दिला. आर्थिक वर्षातील शेवटच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% वाढ केली. यामुळे बँकेचा प्रमुख व्याजदर 6.50% इतका वाढला आहे. यामुळे विद्यमान कर्जांच्या मासिक हप्त्याचा भार वाढणार असून नजीकच्या काळात सर्व प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. (RBI Hike Repo Rate by 25 basis point emi set to rise in near term )
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बुधवारी पतधोरण जाहीर केले. यात पतधोरण समितीतील बहुतांश सदस्यांनी व्याजदरात 0.25% वाढ करण्याच्या बाजूने कौल दिल्याचे दास यांनी सांगितले. ते म्हणाले की रेपो दरात 0.25% वाढ करुन तो 6.50% करण्यात आला आहे. चालू वर्षात बँकेने आतापर्यंत 2.50% व्याजदर वाढवला आहे.
दरम्यान पतधोरणात रेपो दरवाढ झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला तर निफ्टीत 110 अंकांची वाढ झाली होती.
महागाईबाबत शक्तिकांत दास म्हणाले की महागाईचा दर आरबीआयच्या टार्गेटच्या तुलेनत जास्त राहील. रिझर्व्ह बँकेने महागाईचे लक्ष्य 4% इतके ठेवले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 मध्ये महागाई दरात 1.05% घसरण झाल्याचे त्यांनी सांगितले. महागाईवर आरबीआय लक्ष ठेवून आहे, असेही दास यांनी स्पष्ट केले.\
आर्थिक वर्ष 2023 मध्ये विकास दर (GDP) 7% इतका राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जगभरातील बड्या अर्थव्यवस्थांमध्ये विकास दर वाढत आहे. अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे दास यांनी सांगितले.
किती रुपयांनी EMI वाढणार (How much EMI Increased)
- रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.25% वाढ करत तो 6.50% केला आहे. या दरवाढीनंतर विद्यमान कर्जांचे मासिक हप्ते वाढणार आहेत.
- जर 25 लाखांचे गृह कर्ज 7.05% दराने 20 वर्षांसाठी घेतले असेल आणि कर्जदर 7.50% इतका वाढला तर मासिक हप्ता 758 रुपयांनी वाढेल. कर्जदाराला 19458 रुपयांऐवजी 20216 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे.
- कार लोनबाबत देखील अशीच वाढ होणार आहे. 9% दराने 7.5 लाख रुपयांचे वाहन कर्ज 7 वर्ष मुदतीसाठी घेतले असेल आणि व्याजदर वाढीनंतर कर्जाचा दर 10% झाला तर EMI 400 रुपयांनी वाढेल.