Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023: शुद्ध सोने, दागिने की ईटीएफ, सोन्यातील गुंतवणुकीचा कोणता पर्याय योग्य?

Pure Gold Vs Gold Ornaments Vs Gold ETF which is best option

Akshaya Tritiya 2023: सोन्यातील गुंतवणूक ही भारतात सर्वांत सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. गेल्या काही वर्षात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये होत असलेल्या बदलामुळे प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी डिजिटल फॉर्म किंवा पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या विविध प्रकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Akshaya Tritiya 2023: सोन्यातील गुंतवणूक ही भारतात सर्वांत सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. परंपरेनुसार किंवा वर्षानुवर्षे सोन्याच्या किमतीत होत असलेल्या वाढीमुळे सोन्यातील गुंतवणुकीवर भारतीयांचा विश्वास आहे. हिंदु धर्मातील परंपरेनुसार किंवा रितीरिवाजानुसार सोन्याला खूपच महत्त्व आहे. त्यामुळे सोने हा मौल्यवान धातू तर आहेच, पण त्याला पूर्वीपासून मिळत असलेल्या महत्त्वामुळे त्याची किंमत ही वाढत आहे.

गेल्या काही वर्षात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये होत असलेल्या बदलामुळे प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी डिजिटल फॉर्म किंवा पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्यक्ष सोन्याऐवजी सरकारही गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड आणि सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड  यासारख्या पर्यायांना प्रोत्साहन देत आहे. तर आज आपण प्रत्यक्ष शुद्ध सोने, सोन्याचे दागिने की ईटीएफ (Pure Gold, Gold Ornaments & ETF) यापैकी कोणती गुंतवणूक योग्य ठरू शकते. त्यापूर्वी आपण हे तिन्ही प्रकार नेमके काय आहेत आणि त्याचे फायदे-तोटे काय आहेत. याबाबत जाणून घेणार आहोत.

शुद्ध सोन्याला सराफा बाजारपेठेत किंवा ग्रामीण भागात चोख सोने म्हटले जाते. हे सोने 24 कॅरेटचे असते आणि त्याची शुद्धता 999.99 असते. त्यामुळे बरेच जण गुंतवणूक म्हणून शुद्ध सोने विकत घेतात. हे बाजारात बिस्किट, कॉईन आणि वळे या स्वरूपात उपलब्ध असतात. यामध्ये इतर कोणताही धातू मिश्र केलेला नसतो. त्यामुळेच याला शुद्ध किंवा चोख सोने म्हटले जाते. पण दागिने बनवण्यासाठी शुद्ध सोन्याचा म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा वापर केला जात नाही. कारण शुद्ध सोने हे खूपच मऊ असते. त्यामुळे त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर केला जात नाही.


सराफा व्यापारी किंवा सोनार दागिने बनवण्यासाठी मिश्रित अशा सोन्याचा वापर करतात. यात प्रामुख्याने 24 कॅरेटच्या खाली 23 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेटच्या सोन्याचा वापर करतात. सोन्याचे दागिने तयार करताना त्यात मजबूतपणा येण्यासाठी त्यात काही प्रमाणात इतर धातुंचा वापर करतात. जेणेकरून दागिने करताना ते टिकाऊ व्हावेत. तसेच त्याचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये रूपांतर करताना त्यात सहजता यावी आणि ते मजबूत राहावेत. यासाठी सोन्याचे दागिने तयार करताना त्यात चांदी, तांबे आदी इतर धातू मिश्रित करतात. तसेच दागिने तयार करण्यासाठी जी कारागिर मेहनत घेतात. त्याची किंमत ही दागिन्याच्या किमतीत जोडली जाते. त्यामुळे दागिने खरेदी करताना ग्राहकांना शुद्ध सोन्याऐवजी 23 किंवा 22 कॅरेटचे सोने मिळते. तसेच त्याच्या डिझाईनचा खर्चदेखील ग्राहकाकडून वसुल केला जातो.

गोल्ड ईटीएफ हा म्युच्युअल फंडमधीलच एक प्रकार आहे. गोल्ड ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक ही या संबंधित कंपन्या गोल्ड बुलिअन आणि सोन्याच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. यामधील सोन्याची शुद्धता ही 99.5 टक्के अशी मानली जाते. गोल्ड ईटीएफ हा प्रत्यक्ष सोन्याच्या गुंतवणुकीला किंवा खरेदीला डिजिटल पर्याय मानला जातो. एक गोल्ड ईटीएफ युनिटचे मूल्य हे 1 ग्रॅम सोन्याच्या बरोबर मानले जाते. त्यामुळे गोल्ड ईटीएफमध्ये किमान 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येते. भारतात एनएसई आणि बीएसई (NSE & BSE)च्या प्लॅटफॉर्मवरून गोल्ड ईटीएफची खरेदी-विक्री करता येते. पण यासाठी गुंतवणूकदाराला ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंटची गरज भासते.

शुद्ध सोन्यातील गुंतवणूक म्हणजे नेमके काय? त्याचे फायदे-तोटे काय?

सोन्यातील गुंतवणूक ही भारतातील सर्वांत प्रसिद्ध आणि प्रचलित गुंतवणूक मानली जाते. यामध्ये समाजातील परंपरा, रीती तसेच सामाजिक आणि भावनिक मूल्ये देखील जोडली आहेत. भारतात शुद्ध सोने नाणे/कॉईन, बार, बिस्किट आणि वळे या स्वरूपात खरेदी करता येते. हे शुद्ध सोने बॅंक, ज्वेलर्स आणि सराफाकडून खरेदी करता येते. याच्या खरेदीवर सरकार 3 टक्के जीएसटी आकारते. त्याचबरोबर याच्या गुंतवणुकीच्या कालावधीनुसार सरकार यावर अल्पकालीन भांडवली नफा आणि दीर्घकालीन भांडवली नफा (STCG-LTCG) आकारला जातो. 3 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर एखाद्याने सोने विकले तर त्याला त्यावर 20 टक्के दीर्घकालीन टॅक्स द्यावा लागतो आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी असेल तर गुंतवणूकदाराच्या टॅक्स स्लॅबनुसार अल्पकालीन भांडवली नफा आकारला जातो.

शुद्ध सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे नक्कीच अनेक फायदे आहेत. जसे की, या धातुला जगभर मान्यता आहे. सराफा बाजारपेठेत दररोजच्या किमतीनुसार याची खरेदी-विक्री करता येते. तसेच हे सोने गहाण ठेवून यावर रोख रक्कम कर्ज स्वरूपात घेता येते. याचे जसे फायदे आहेत. त्याचप्रमाणे याचे काही तोटे सुद्धा आहेत. जसे की, शुद्ध सोन्यामध्ये गुंतवणूक करताना, सोन्याचे बिस्किट हे किमान 10 ग्रॅमचे असते. त्यामुळे यासाठी अधिकची रक्कम खर्च करावी लागते. त्याचबरोबर ते खरेदी केल्यानंतर त्याची सुरक्षितता सुद्धा ठेवावी लागते. नाहीतर त्याची चोरी होण्याची भीती असते. ते लॉकरमध्ये ठेवले तर त्यासाठी अधिकचे शुल्क भरावे लागते.

प्रत्यक्ष सोन्याऐवजी काही गुंतवणूकदार, गुंतवणूक म्हणून सोन्याचे दागिने खरेदी करतात. पण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी याला गुंतवणूक मानली जात नाही. कारण सोन्याचे दागिने हे चोख सोन्यापासून बनत नाहीत. दागिने तयार करण्यासाठी त्यात काही धातू मिश्रित करावे लागतात. तसेच दागिने बनवण्यासाठी कारागिरांना विशेष मेहनत करावी लागते आणि त्याचा खर्चही ज्वेलर्सनुसार/सराफानुसार वेगवेगळा असतो. त्याचबरोबर हे सोने विकताना त्यात मिश्र केलेल्या धातुंची घट पकडली जाते. त्यामुळे दागिने विकत घेताना जेवढी किंमत ग्राहक देतो. तेवढीच किंमत ते सोने विकताना किंवा त्याचा नवीन दागिना तयार करताना मिळत नाही. अशावेळी ग्राहकाचे आर्थिक नुकसान होते.

Various investment options in gold

गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक आणि फायदे-तोटे

गोल्ड ईटीएफ हा प्रत्यक्ष सोने खरेदीला असणारा डिजिटल पर्याय आहे. याची खरेदी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर डीमॅट खात्याद्वारे करता येते. तसेच याच्या सुरक्षिततेसाठी वेगळी सोय करावी लागत नाही. लॉकरवर अधिकचे पैसे खर्च करावे लागत नाही.किमान 1 ग्रॅम युनिटमध्ये याची खरेदी करता येते. 2023 पासून गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीवर सरकारने टॅक्स लागू केला आहे. 3 वर्षांच्या आतील गुंतवणुकीवर यावर STCG लागू होतो. तर 3 वर्षांवरील गुंतवणुकीवर LTCG लागू होतो. यामध्ये गुंतवणूकदाराला LTCG मध्ये कर सवलत मिळत नाही.

चोख सोने, सोन्याचे दागिने आणि गोल्ड ईटीएफ याचे प्रत्येकाचे काही ना काही फायदे-तोटे आहेत. गुंतवणूकदारांनी आपले उद्दिष्ट आणि गरज लक्षात घेऊन त्यात गुंतवणूक केली पाहिजे. तसेच काही प्रमाणात गरजेप्रमाणे या तिन्ही प्रकारांमध्ये ही गुंतवणूक केली जाऊ शकते.

(डिस्क्लेमर: 'महामनी' कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या.)