सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये (SGB) गुंतवणूक करण्याची संधी ग्राहकांना आजपासून (सोमवार) मिळत आहे. 2023-24 साठी सिरिज -1 बाँडची किंमत जाहीर झाली आहे. 19 जून ते 23 जून या काळात बाँडसाठी अप्लाय करता येईल. 27 जूनला बाँड जारी केले जातील.
राष्ट्रीय/खाजगी बँका, पोस्ट ऑफिस आणि अधिकृत ब्रोकर्सकडून ग्राहकांना या बाँडसाठी अप्लाय करता येईल. (SGB open for apply) आरबीआयच्या संकेतस्थळावरुनही ऑनलाइन अप्लाय करता येईल. सॉवरेन गोल्ड बाँडचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात जाहीर होईल.
प्रति ग्रॅम सोन्याचा दर काय?
सॉवरेन गोल्ड बाँड हे 1 ग्रॅम सोन्याच्या पटीत विक्री केले जातात. बाँड ज्या आठवड्यात जाहीर होतात, त्याआधीच्या आठवड्यातील सोन्याच्या सरासरी किंमतीवरुन गोल्ड बाँडची किंमती ठरवली जाते. सोन्याचे दर India Bullion and Jewellers Association Ltd (IBJA) या संस्थेचे अधिकृत मानले जातात. या वर्षीच्या पहिल्या टप्प्याचा प्रति ग्रॅम सोन्याचा दर 5,926 रुपये आहे. म्हणजेच गोल्ड बाँड खरेदी करण्यासाठी कमीतकमी 5,926 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
सबस्क्रिप्शनवर डिस्काउंट मिळतो का?
ऑनलाइन अप्लाय करुन डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट दिली जाते. त्यामुळे अशा गुंतवणुकदारांना 5,876 रुपये प्रति ग्रॅमसाठी भरावे लागतील.
गोल्ड बाँड खरेदी करताना पेमेंट संबंधित नियम काय?
गोल्ड बाँड खरेदी करताना फक्त 20 हजार रुपयांचे पेमेंट कॅशमध्ये (नकद) करू शकतो. या पेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करण्यासाठी ड्राफ्ट, चेक आणि इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल बँकिंग पर्याय निवडावा लागेल.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड कोण आणि किती खरेदी करू शकतं?
सॉवरेन गोल्ड बॉण्ड हे वैयक्तिक भारतीय नागरिक, तसेच हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था खरेदी करू शकतात. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलोपर्यंतच्या बाँडची खरेदी करता येते. हिंदू अविभक्त कुटुंबांना 4 किलो आणि ट्रस्टला 20 किलोपर्यंत गुंतवणूक करता येईल.
गोल्ड बाँडवरील व्याज कधी मिळते?
एकदा गुंतवणूक केल्यानंतर 2.50% वार्षिक व्याज गुंतवणूकदाराला मिळते. हे व्याज वर्षातून दोनदा सहा महिन्यांच्या अंतराने दिले जाते.
गोल्ड बाँड गुंतवणुकीवर कर भरावा लागतो का?
आयकर कायदा 1961 नुसार गोल्डवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सही आकारला जातो. मात्र, यावर इंडेक्सेशन बेनिफिट मिळते. म्हणजेच महागाईचा दर विचारात घेऊन करआकारणी होते.