Sovereign Gold Bond FAQ: सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड स्कीम म्हणजेच सार्वभौम सुवर्ण रोखे बॉण्ड योजना ही सोन्यामध्ये (Gold Commodity) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि आर्थिक मालमत्ता तयार करण्याच्या दृष्टिने सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड ही महत्त्वाची योजना ठरू शकते. या योजनेबाबत गुंतवणूकदारांमध्ये बरेच संभ्रम आहेत. तो संभ्रम आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Table of contents [Show]
- सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड काय आहे? ते कोण इश्यू करतं?
- प्रत्यक्ष सोन्याऐवजी सॉव्हरिन बॉण्ड का खरेदी करावेत? त्याचे फायदे काय आहेत?
- सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये जोखीम आहे का?
- सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?
- सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये एकत्रितरीत्या गुंतवणूक करता येते का?
- अल्पवयीन बालकांच्या नावे यात गुंतवणूक करता येते का?
- गुंतवणूक करण्यासाठी अर्ज कुठे मिळेल?
- सॉव्हरिन गोल्डमध्ये गुंतवणूक करताना केवायसीचे नियम काय आहेत?
- SGB मध्ये गुंतवणुकीची कमाल आणि किमान मर्यादा काय आहे?
- सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड विक्रीच्या अधिकृत एजन्सी कोणत्या आहेत?
- ऑनलाईन सॉव्हरिन गोल्ड बॉण्डची खरेदी करता येते का?
- आरबीआय गोल्ड बॉण्डची किंमत जाहीर करते का?
- सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीवर टीडीएस लागू होतो का?
सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड काय आहे? ते कोण इश्यू करतं?
सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond-SGB) हा एक सरकारी बॉण्डचा प्रकार असून याची सरकार स्वत: हमी घेते. प्रत्यक्ष सोने खरेदीला हा एक पर्याय मानला जातो. गुंतवणूकदार हे बॉण्ड रिडिम करून रोख रक्कम मिळवू शकतात. हे बॉण्ड सरकारच्यावतीने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया वितरित करते.
प्रत्यक्ष सोन्याऐवजी सॉव्हरिन बॉण्ड का खरेदी करावेत? त्याचे फायदे काय आहेत?
सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड हा प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याला एक चांगला पर्याय आहे. यामुळे प्रत्यक्ष सोने जसे सुरक्षित ठेवावे लागते. तसे गोल्ड बॉण्डसाठी विशेष काळजी घ्यावी लागत नाही. बॅंक लॉकरची गरज भासत नाही. तसेच प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीवर मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. तसेच त्या सोन्यापासून दुसरा दागिना बनवताना त्यात घट पकडली जाते. पण गोल्ड बॉण्डमध्ये अशी घट किंवा मेकिंग चार्जेस द्यावे लागत नाही.
सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये जोखीम आहे का?
सॉव्हरिन गोल्ड बॉण्डचे वितरण आरबीआयद्वारे होत असल्यामुळे त्याची संपूर्ण हमी सरकार घेते.
सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?
फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट, 1999 मध्ये नमूद केलेल्या पात्रतेनुसार भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. पात्र गुंतवणूकदारांमध्ये वैयक्तिक व्यक्ती, हिंदु अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांचा समावेश होतो.
सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये एकत्रितरीत्या गुंतवणूक करता येते का?
होय, सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये एकत्रितरीत्या गुंतवणूक करता येते.
अल्पवयीन बालकांच्या नावे यात गुंतवणूक करता येते का?
होय, पालक अल्पवयीन बालकांच्या नावाने एसजीबीमध्ये गुंतवणूक करू शकतात.
गुंतवणूक करण्यासाठी अर्ज कुठे मिळेल?
एसजीबीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बॅंक/पोस्ट ऑफिस मधून अर्ज मिळू शकतो. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेच्या वेबसाईटवरूनही अर्ज डाऊनलोड करता येतो. तसेच काही बॅंका एसजीबी खरेदीसाठी ऑनलाईन सेवा देतात.
सॉव्हरिन गोल्डमध्ये गुंतवणूक करताना केवायसीचे नियम काय आहेत?
प्रत्येक गुंतवणूकदाराला इन्कम टॅक्स विभागाकडून मिळालेल्या पॅनकार्ड आधारे अर्ज करावा लागतो.
SGB मध्ये गुंतवणुकीची कमाल आणि किमान मर्यादा काय आहे?
SGB द्वारे एका आर्थिक वर्षात वैयक्तिक गुंतवणूकदार किमान 1 ग्रॅम आणि कमाल 4 किलोपर्यंत गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकतो. तर हिंदु अविभिक्त कुटुंबासाठीची मर्यादा 4 किलो आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा 20 किलो इतकी आहे.
सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड विक्रीच्या अधिकृत एजन्सी कोणत्या आहेत?
राष्ट्रीय बॅंका / खाजगी बॅंका / पोस्ट ऑफिस आणि अधिकृत ब्रोकर्स हे सॉव्हरिन गोल्ड बॉण्डची अधिकृत विक्री करू शकतात.
ऑनलाईन सॉव्हरिन गोल्ड बॉण्डची खरेदी करता येते का?
होय, ग्राहक बॅंकांची संकेतस्थळे आणि आरबीआयच्या वेबसाईटवरून गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकतात. यासाठी ग्राहकांना प्रत्येक ग्रॅमच्या बॉण्डमागे 50 रुपयांची सवलत मिळते. तसेच याचे पेमेंट हे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून केले जाते.
आरबीआय गोल्ड बॉण्डची किंमत जाहीर करते का?
होय, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया गोल्ड बॉण्ड इश्यू करण्याच्या दोन दिवस अगोदर त्याची किंमत वेबसाईटवर जाहीर करते.
सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीवर टीडीएस लागू होतो का?
सॉव्हरिन गोल्ड बॉण्डवर टीडीएस लागू होत नाही. पण गुंतवणूकदाराने इन्कम टॅक्स कायद्यामध्ये नमूद केल्यानुसार संबधित नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.