Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

‘ईएमआय’वर वस्तू खरेदी करताना विचारात घेण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

EMI

ईएमआय (EMI) ही अशी गोष्ट आहे की, ती आपल्या समाधानी जीवनात अस्वस्थता निर्माण करते. ईएमआयच्या अधिक आहारी न जाता आहे ते कर्ज किंवा ईएमआय योग्यरितीने कसे पूर्ण करता येईल, याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे.

आजकाल बाजारात सर्व गोष्टी ईएमआयवर (EMI) म्हणजेच मासिक हप्त्यावर मिळतात. होमलोनपासून मोबाईल, कपडे खरेदी, पर्यटन अशा एक ना अनेक गोष्टी सुलभ हप्त्यावर उपलब्ध झाल्या आहेत. असे असले तरी आपले उत्पन्न, गरजा आणि भविष्यातील तरतुदीचा विचार करूनच कर्जावर किंवा ईएमआयवर वस्तू खरेदीचा विचार केला पाहिजे. किरकोळ गोष्टी ईएमआयवर खरेदी केल्या जाऊ लागल्या तर भविष्यात आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याची शक्यता अधिक असते. ईएमआयवर गरजेच्या गोष्टी घ्यायला हरकत नाही. पण अनावश्यक गोष्टींसाठी ईएमआयचा पर्याय न स्वीकारता रोख रकमेने वस्तू विकत घेणे किंवा काही दिवस थांबणे हे एक शहाणपणाचे लक्षण ठरू शकते. ईएमआयचा ओव्हरडोस आर्थिक विवंचनेत भर पाडू शकतो.

विवाहापूर्वी आणि विवाहानंतरच्या स्थितीत होणारे बदल, कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण, लग्नसमारंभ यासाठी करावी लागणारी तरतूद याचा विचार करणे अपरिहार्य ठरते. ईएमआय ही अशी गोष्ट आहे की, ती आपल्या समाधानी जीवनात अस्वस्थता निर्माण करते. ईएमआयच्या अधिक आहारी न जाता आहे ते कर्ज किंवा ईएमआय योग्यरितीने कसे पूर्ण करता येईल, याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे.

...अन्यथा आर्थिक गणितं चुकतात 

कर्ज किंवा ईएमआय हे एखाद्या कोलोस्ट्रॉलप्रमाणे आहे. त्याचा समतोल बिघडला तर चांगले किंवा वाईट परिणाम होतात. शरीरातील कोलॉस्ट्रॉलची स्थिती चांगली राहिली तर प्रकृती चांगली राहते. त्याचे प्रमाण आवाक्याबाहेर झाले तर शरीरावर दुष्परिणाम व्हायला सुरूवात होते. याचाच अर्थ असा की, कर्ज किंवा ईएमआय मर्यादित प्रमाण असेपर्यंत आर्थिक स्थितीत फारसा फरक पडत नाही. जर त्याचे प्रमाण वाढले तर आर्थिक गणितं चुकायला लागतात. त्यासाठी आपल्या होमलोन (Home Loan), वैयक्तिक कर्ज (Personal Loan) किंवा अन्य वस्तू खरेदी करताना स्वीकारलेला ईएमआयचा (EMI) पर्याय, याचा सातत्याने आढावा घ्यायला पाहिजे. त्यातून आपल्याला आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे सोपे जाते. अचानक उद्भवणारा खर्चसुद्धा ईएमआयवर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे आपत्कालीन स्थितीसाठी पैसे बाजूला काढून ठेवायला हवे.

ईएमआय चांगला की वाईट!

जर तुमच्या हातात प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये पगार येत असेल, आणि त्यापैकी कर्जाचा हप्ता (Loan EMI) 20 ते 25 हजार रुपये असेल तर तुम्ही बॉर्डरलाईनवर आहात, असे समजावे. प्रत्येक महिन्याला तुमच्या हातात पडणार्‍या एकूण रकमेपैकी 20 टक्के रकमेएवढाच ईएमआय असावा. तरच ती कर्जस्थिती काही प्रमाणात आदर्शवत मानली जाते. तुमच्या अगोदरच आर्थिक बोझा असताना कर्ज घेण्याचे शक्यतो टाळले पाहिजे. अकारण कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे ठरू शकते.

आमिषांना बळी पडू नका!

बाजारात सेल आहे किंवा ऑफर आहे; म्हणून त्याला बळी पडून हप्त्यावर वस्तू खरेदी करणं ही धोक्याची घंटा ठरू शकते. घराच्या किमती आवाक्याबाहेर गेलेल्या असताना आपण त्या खरेदीचा आग्रह करणे आर्थिक नियोजनावर पाणी फेरण्यासारखे आहे. त्यानंतर सुरू होणारे हप्ते आर्थिक ताणात भर घालणारे वाटू शकतात.
तुम्हाला जर चांगला परतावा मिळणार असेल तर अशावेळी कर्ज काढून घर खरेदी करणं योग्य ठरू शकते. भविष्यात चांगला परतावा मिळणार्‍या गोष्टी घेण्यास हरकत नाही. परंतु ज्या वस्तूंची किंमत कालांतराने कमी होणार आहे, अशासाठी ईएमआय किंवा कर्ज घेऊ नये आणि खरेदी जरी केली तरी त्याचा ईएमआय कमी कसा राहील, याचा विचार केला पाहिजे.

परवडणारे कर्ज आणि परवडणारा हप्ता!

कर्ज घेताना दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे परवडणारे कर्ज आणि परवडणारा हप्ता (EMI). दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. परवडणारा हप्ता काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी घेऊ शकतो. पण कर्जाबाबत असे करता येत नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास 28 ते 30 लाखांच्या कर्जासाठी 30 हजाराचा हप्ता भरावा लागतो. परंतु या हप्त्याची मुदत 20 ते 25 वर्ष इतकी असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. कारण कालांतराने खर्चात वाढ होत राहते आणि कर्जाचे हप्ते मात्र दीर्घकाळ सुरू राहतात.

कालांतराने प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न जरी वाढत असले तरी महागाईही भडकत असते. त्याचा परिणाम असा होतो की, आपल्यावरचे आर्थिक ओझे नकळत वाढत जाते. त्यामुळे भविष्यातील खर्चाचा ताळमेळ लक्षात घेऊन ईएमआयचा पर्याय निवडणं योग्य ठरू शकतं.