Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयने रेपो दर का वाढवला? त्याचा ईएमआयवर काय परिणाम होतो?

rbi repo rate

रेपो दर वाढल्याने होम लोन, कार लोन किंवा इतर कोणत्याही कर्जावर याचा परिणाम होणार आहे. आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर अनेक सरकारी व खाजगी बॅंकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महिन्याभराच्य फरकाने दोनदा रेपो दरात वाढ केली. सर्वप्रथम 4 मे रोजी आरबीआयने अचानक 0.40 बेसिस पॉईंटने रेपो दरात वाढ केली. त्यानंतर 8 जून रोजी पुन्हा एकदा आरबीआयने 0.50 बेसिस पॉईंटने रेपो दर वाढवला. अशाप्रकारे आरबीआयने एकूण 0.90 बेसिस पॉईंटने रेपो दरात वाढ केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


रेपो दर वाढण्याचे कारण!

देशाचा किरकोळ महागाई दर मागील तीन ते चार महिन्यांपासून 6 टक्क्यांच्या वर होता. हा किरकोळ महागाई दर कमी करून तो 4 टक्क्यांवर आणण्याची जबाबदारी रिझर्व्ह बॅंकेवर सोपवण्यात आली आहे. अशावेळी आरबीआयने वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती (Monitary Policy Committee) रेपो दरात कपात किंवा वाढ करण्याची सूचना वेळोवेळी करत असते. त्यानुसार रिझर्व्ह बॅंक रेपो दर जाहीर करते. 

साधारणत: देशातील महागाई (Inflation) आणि विकासदर (Growth Rate) नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दराचा वापर केला जातो. आरबीआयने दोनदा रेपो दरात वाढ करून तो 90 बेसिस पॉईंटने वाढवला. त्यामुळे तो 4 टक्क्यांवरून 4.90 टक्के झाला आहे. यामुळे देशातील बॅंकांनीही त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. परिणामी, कर्जाची मागणी कमी होऊन लोक बचत करण्यावर भर देतील, असा अंदाज आरबीआयने बांधण्याची शक्यता आहे. तसेच आरबीआय जेव्हा रेपो दर कमी करते. तेव्हा बॅंकेच्या कर्जावरील व्याजदर कमी होतात. त्यामुळे ग्राहकांकडून मोठ्या संख्येने विविध गोष्टींसाठी कर्ज घेतले जाते. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून बाजारात पैसा खेळता राहतो.

काय परिणाम होणार?

रेपो दर वाढल्याने होम लोन, कार लोन किंवा इतर कोणत्याही कर्जावर याचा परिणाम होणार आहे. आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर अनेक सरकारी व खाजगी बॅंकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली. जुन्या कर्जधारकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार तर नवीन कर्जधारकांसाठी कर्ज महागली. अशाप्रकारे नवीन आणि जुन्या दोन्ही कर्जदारांवर याचा परिणाम झाला आहे.

रेपो दर म्हणजे काय?

आरबीआयकडून इतर बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते, त्याला रेपो दर (Repo Rate) म्हणतात. रेपो दर वाढल्याने बँकांना आरबीआयकडून जास्त दराने कर्ज दिले जाते. त्यामुळे बॅंकाही ग्राहकांना आणखी व्याजदर वाढवून कर्ज देतात. यामुळे होम लोन, कार लोन आणि वैयक्तिक कर्ज यावरील व्याजदरात वाढ झाली. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ईएमआय (EMI) वर झाला.

अशाप्रकारे ईएमआय वाढला

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे त्याचा ईएमआयवर कसा परिणाम झाला, हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा एका व्यक्तीने घरासाठी बॅंकेकडून 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले. बॅंकेने हे कर्ज 20 वर्षांसाठी 7.4 टक्के दराने दिले. या कर्जासाठी बॅंक प्रत्येक महिन्याला कर्जदाराकडून 39,974 रुपये ईएमआय घेते. आता आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर बॅंकांनीही त्यांचे व्याजदर वाढवले. बॅंकेने वरील व्याजदरात वाढ करून ग्राहकाकडून 7.9 टक्के दराने व्याज आकारण्यास सुरूवात केली. यामुळे संबंधित कर्जदाराचा मासिक ईएमआय 39,974 रूपयांवरून 41,511 रूपये इतका झाला. प्रत्येक महिन्याला 1500 रूपये याप्रमाणे एका वर्षाला बॅंकेला होम लोनवर 18 हजार रूपये अधिक द्यावे लागणार आहेत.

देशातील महागाई (Inflation), विकासदर (Growth Rate) आणि बाजारातील पैशांचा ओघ नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दराचा वापर करत असते. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्जावर आणि बचतीच्या व्याजदरांवर होत असतो.

image source- https://bit.ly/3NInJ3r