Solapur onion farmer: महाराष्ट्रात कांद्याचे दर कोसळले असून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने काद्यांचे दर कोसळले आहेत. सोलापूर येथील एका शेतकऱ्याला 512 किलो कांद्याची विक्री केल्यानंतर हातात फक्त 2 रुपये आले आहेत. तेही चेकद्वारे. राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या शेतकऱ्याचे नाव असून कांदा विकण्यासाठी 70 किलोमीटर दूर ते आले होते.
10 पोते कांदे विकून मिळाले 2 रुपये
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर मार्केट यार्डात (Solapur APMC) 17 फेब्रुवारीला 10 पोते कांदा विक्रीस आणला होता. या कांद्याला 1 रुपये किलो एवढा कमी भाव मिळाला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने सर्व खर्च वजा केल्यानंतर दोन रुपयांचा चेक दिला.
'चेक जमा करण्याची इच्छा नाही'
मोटारभाडे, हमाली, तोलाई यामध्येच सगळे पैसे गेले. खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्याला 2.49 रुपयांची पावती मिळाली. (Solapur onion farmer) तसेच पोस्ट डेटेड चेक मिळाला. हा चेक पंधरा दिवसानंतर वटवता येणार आहे. बँकेच्या नियमानुसार 49 पैसे चेकमध्ये दाखवता येत नसल्याने फक्त 2 रुपयांचा चेक मिळाला. हा चेक बँकेत जमा करण्याची इच्छाही नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं.
प्रति किलोला 1 रुपये भाव मिळाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. APMC व्यापाऱ्याने 509.50 रुपये वाहतूक भाडे वजा केले. बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या किंमती मागील काही वर्षात दुप्पट झाल्या आहेत. कांदा उत्पादनासाठी 40 हजार रुपये खर्च आल्याचे चव्हाण हताश होऊन सांगितले.
लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे आजचे भाव
लासलगाव बाजार समितीमध्ये आज शुक्रवारी 13 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात चांगल्या कांद्याला 1 हजार रूपये भाव मिळाला. तर इतर कांद्याची सरासरी विक्री 550 रूपयांनी झाली. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव 300 रूपये मिळाला. काल गुरूवारी बाजार समितीमध्ये एकूण 29 हजार 508 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यात चांगल्या कांद्याला 1 हजार 201 रूपये भाव मिळाला. इतर कांद्याची सरासरी विक्री 551 रूपयांनी झाली.
सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतिच्या कांद्याला 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तर मध्यम दर्ज्याच्या कांद्याला 500-600 रुपये भाव मिळत आहे. हलक्या दर्जाच्या कांद्याला 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.