फोर्ब्सने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या यादीनुसार, 2022 मध्ये पीव्ही सिंधू ही जगातील 12वी सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू आहे. अमेरिकन मासिकाने प्रसिद्ध केलेल्या टॉप 25 महिला खेळाडूंच्या यादीत 27 वर्षीय स्टार भारतीय शटलर ही एकमेव भारतीय आहे. महिला शटलरमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते.
त्याआधी तीने जानेवारीमध्ये लखनऊमध्ये सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल, मार्चमध्ये स्विस ओपन आणि जुलैमध्ये सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली होती. दुखापतीमुळे सिंधू कॉमनवेल्थ गेम्सपासून खेळलेली नाही. मात्र तरीही तिने जागतिक क्रमवारीत आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.
सिंधू आता या महिन्याच्या अखेरीस नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया ओपनमध्ये खेळताना दिसणार आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये सिंधूची एकूण कमाई 7.1 मिलियन डॉलर म्हणजेच 59 कोटी रुपये होती. जपानची टेनिसपटू नाओमी ओसाका सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. तीच्यानंतर अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा क्रमांक लागतो.
टेनिसपटू आघाडीवर
सिंधूपेक्षा जास्त मानधन घेतलेल्या 11 खेळाडूंपैकी सात टेनिसपटू आहेत. एलियन (फ्रीस्टाईल स्कीइंग, चीन), सिमोना बायल्स (जिम्नॅस्टिक्स, यूएसए), मिंजी ली (गोल्फ, ऑस्ट्रेलिया) आणि कॅंडेस पार्कर (बास्केटबॉल, यूएसए) हे खेळाडू देखील या यादीत आहेत. यांची कमाई सिंधूपेक्षा जास्त आहे.
आठ महिला खेळाडूंनी 10 मिलियन डॉलरपेक्षा पेक्षा जास्त कमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेषत: सिंधूने मैदानातून म्हणजे कोणत्याही उत्पादनाच्या जाहिराती आणि जाहिरातीतून सात मिलियन डॉलर्स कमावले आहेत. तिच्यापेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये फक्त सिमोन बायल्सची मैदानावरील कमाई सिंधूच्या तुलनेत कमी आहे.