स्टार्टअप्समध्येच (Startups) नाही तर सर्वसामान्यांमध्येही शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा शो आवडीनं पाहिला जातो. देशभरात नवीन कल्पना (Ieda) घेऊन आलेले नवउद्योजक यात सहभागी होतात. जजेसना प्रभावित केल्यास त्यांच्याकडून या नवउद्योजकांना निधी दिला जातो. त्यामुळे मोठं सहाय्य त्यांना होत असतं. मात्र आता नवीच माहिती समोर आली आहे. यातून मिळालेल्या निधीबाबत (Fund) एक अहवाल समोर आला आहे. हा एक निराशाजनक असा अहवाल असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Table of contents [Show]
प्रायव्हेट सर्कल रिसर्चचा रिपोर्ट
शार्क टँक इंडियाच्या संदर्भात प्रायव्हेट सर्कल रिसर्चनं एक रिपोर्ट केला आहे. यात म्हटलं आहे, की शार्क टँक इंडियाच्या शार्क्सनी म्हणजेच गुंतवणूकदारांनी आतापर्यंत पहिल्या सीझनमध्ये जवळपास 65 स्टार्टअप्सना निधी देण्याचं मान्य केलं होतं. त्यापैकी केवळ 27 आश्वासनंच त्यांनी पूर्ण केली आहेत. म्हणजेच 65पैकी केवळ 27 स्टार्टअप्सना निधी देण्यात आला आहे.थोडक्यात काय, तर शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये शार्क्सनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत.
40 कोटी रुपयांपैकी मिळाले केवळ 17 कोटी
प्रायव्हेट सर्कल रिसर्चनं याविषयी सविस्तर विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणानुसार, व्हॅल्यू टर्मचा विचार केल्यास शार्कनं पहिल्या हंगामात एकूण 40 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आतापर्यंत फक्त 17 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
स्पर्धकांच्या तोंडून सत्य बाहेर
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, एका स्पर्धकानं मुलाखतीदरम्यान सांगितलं, की साधारणपणे निधीचा हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी 2 ते 3 महिने लागतात. पण काही शार्क जाणीवपूर्वक उशीर लावतात. त्यांना अतिरिक्त कागदपत्रांची गरज असते. त्यांची लीगल टीम तुमच्या कॉलला प्रतिसाद देत नाही आणि त्यांचे टीम मेंबर ते सुट्टीवर आहेत किंवा नवं वर्ष आल्यासारखं असं काहीतरी वागत असतात. काही फाउंडर्स अजूनही फायनल कॉलच्या म्हणजेच गुंतवणूक होणार आहे की नाही, या प्रतीक्षेत आहेत. काहींनी तर आशाच सोडली आहे. हा प्लॅटफॉर्म केवळ एक मार्केटिंग असल्याचं काहींचं म्हणणं आहे.
सीझन 1मधली कोणकोणती आश्वासनं पूर्ण?
शार्क टँकच्या सीझन वनमधल्या गुंतवणूकदारांमध्ये भारत पेचे संस्थापक अशनीर ग्रोव्हर, लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल, शादी डॉट कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल, बोटचे संस्थापक अमन गुप्ता, मामाअर्थचे संस्थापक गझल अलघ, शुगर कॉस्मेटिक्सच्या संस्थापक विनिता सिंग आणि एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या प्रमुख नमिता थापर यांचा समावेश होता.
कुणी किती पाळला शब्द?
या सात शार्क्सपैकी, नमिता थापर यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या 59 टक्के कमाल वचनबद्धता पूर्ण केली. त्यांनी एकूण 22 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं वचन दिलं होतं. त्यापैकी 13 कंपन्यांनी गुंतवणूक दाखल केली आहे. दुसरीकडे, अनुपम मित्तल यांनी किमान गुंतवणूक वचनबद्धता पूर्ण केली. 24 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणार असल्याचं सांगितलं. प्रत्यक्षात फक्त 7 कंपन्यांमध्येच पैसे गुंतवले. त्याच्या गुंतवणुकीची टक्केवारी सर्वात कमी 29 टक्के राहिली.
अशनीर ग्रोवर यांचं स्पष्टीकरण
सीझन वनमधले जज अशनीर ग्रोवर यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 11 डील क्रॅक केल्या असून यात 2.95 कोटी रुपये गुंतवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपण कमिटमेंट पूर्ण करण्याच्या बाबतीत नमिता थापर यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
I, Ashneer Grover, invested ₹2.95 crores | 11 deals in Shark Tank Season 1.
— Ashneer Grover (@Ashneer_Grover) July 19, 2023
This makes me second highest deployer, only after @namitathapar who was highest both in terms of absolute and % closure. No surprises - Namita is a great pay master ! Both Namita and I are the top 2 in… pic.twitter.com/Ot16kHOrpc
अमन गुप्तांची प्रतिक्रिया
आम्ही आमची संपत्ती मेहनतीनं कमावली आहे. ती अशीच विनामेहनत कुठेही दिली जाणार नाही. बोटसाठी निधी मिळवण्याची प्रक्रिया आम्ही 2016पासून सुरू केली. तेव्हा आम्हाला 2018मध्ये कुठे फंड मिळाला, असं अमन गुप्ता म्हणाले.
एकूण परिस्थिती
शार्क टँक सीझन 1मध्ये एकूण 117 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी 65 स्टार्टअप्सना डील कमिटमेंट मिळाले. यापैकी नमिता थापर यांनी सर्वाधिक 7 कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर गझल अलग यांनी सर्वात कमी 40 लाख रुपयांची गुंतवणूक केली.
काय आहे शार्क टँक?
शार्क टँक इंडिया हा एक रिअॅलिटी टेलिव्हिजन शो आहे. याठिकाणी नवउद्योजक त्यांचं व्यवसाय मॉडेल गुंतवणूकदारांच्या पॅनेलसमोर म्हणजेच शार्क्ससमोर सादर करतात आणि निधी मिळवण्याचा प्रयत्न करतात. याची सुरुवात आधी अमेरिकेत झाली. त्याचं हे भारतीय व्हर्जन आहे.