आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 59,463.93 वर घसरला आणि निफ्टी 17,465.80 वर बंद झाला आहे. बाजारात सलग सहा दिवस घसरण सुरू आहे. आठवड्याभराचा विचार केला तर बाजार सुमारे 3 टक्के इतका घसरला आहे. शुक्रवारी ऑटो, मेटल आणि बँकिंग स्टॉक बाजारामध्ये सर्वाधिक घसरले. शेअर बाजारात होत असलेल्या या घसरणीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. विश्लेषक या शेअर बाजारातील घसरणीची विविध कारणे सांगत आहेत. जागतिक बाजारातील कमकुवतपणा, डॉलर इंडेक्समध्ये तेजी अशी कारणे यामागे सांगितली जात आहेत. त्याचबरोबर बाजारपेठेतील शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आल्याचेही निरीक्षक सांगत आहेत.
ऑटो, रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्येही प्रेशर दिसून आले..आजच्या ट्रेडमध्ये, डिव्हिस लॅबोरेटरीज, अदानी बंदर, आशियाई पेंट्स, कोल इंडिया तेजीत दिसत होते. मात्र त्याच वेळी अदानी एंटरप्राइजेस, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एम अन्ड एम, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टील यांची निफ्टीमध्ये घसरण झाली. बाजारात विक्रीमध्ये वाढ झाली आहे. याचा गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. 16 फेब्रुवारी रोजी बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 2.68 लाख कोटी होते. हेच 24 फेब्रुवारी रोजी 2.60 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. गुंतवणूकदारांनी या कालावधीत 8 लाख कोटी गमावले आहेत.
सकाळी मात्र शेअर बाजाराचे चित्र वेगळे दिसत होते. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार शुक्रवारी सकारात्मक पातळीवर उघडलेला बघायला मिळाला. सकाळी 09:18 वाजता, 30 शेअर्सचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( BSE) निर्देशांक सेन्सेक्स 245.25 अंकांच्या म्हणजेच 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 59 हजार 851.05 अंकांच्या पातळीवर ट्रेड करताना दिसत होता. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी (NSE Nifty) 67.30 अंकांच्या म्हणजेच 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 17 हजार 578.55 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत असलेला बघायला मिळाला. बाजारापूर्वीच सेन्सेक्स 250 अंकांनी वर गेला होता.सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 50 अंकांच्या किंवा 0.28 टक्क्यांच्या वाढीसह 17 हजार 641 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. दलाल स्ट्रीटची (शेअर मार्केट) सुरुवात सकारात्मक होणार असल्याचे संकेत यातून मिळत होते. अमेरिकन शेअर बाजारांमध्ये चमक परतल्यामुळे गुरुवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. टोकियोचा बेंचमार्क निक्केई (Nikkei) 225 सुरुवातीच्या सत्रात 0.22 टक्क्यांनी वधारला होता. अमेरिकी शेअर बाजार गुरुवारी वाढीसह बंद झाले. गुरुवारी, सलग चार सत्रातील एसअँडपी 500 (S&P500) निर्देशांकातील घसरण संपुष्टात आली आणि वाढीसह बंद झाला. शुक्रवारी देशांतर्गत बाजाराची सुरुवात वाढीसह झाली मात्र अंतिमत: बाजार घसरणीसह बंद झाला.