अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग अहवालाला इतके दिवस उलटूनही बाजारावर त्याचा परिणाम सुरूच आहे. गुरुवारच्या व्यापार सत्रातील चढ-उतारात सेन्सेक्स 224.16 अंकांच्या वाढीसह 59,932.24 अंकांच्या पातळीवर बंद झाला आहे. त्याच वेळी, निफ्टी 5.90 अंकांच्या घसरणीसह 17610.40 अंकांच्या पातळीवर बंद झाला आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण गुरुवारीही कायम राहिलेली दिसून आली. कंपनीचे बहुतांश शेअर लोअर सर्किटला लागले. एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील समभागांनी वाढ दर्शविली आहे.
आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण पाहायला मिळाली. या काळात आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्सनी वाढ दाखवली. स्टेट बँक, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घट दिसून आली होती.
गुरुवारी सकाळी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. यादरम्यान सेन्सेक्स 249 अंकांच्या घसरणीनंतर 59459 वर उघडला, तर निफ्टी 17517 अंकांच्या पातळीवर उघडला होता. अदानी समूहाच्या शेअर्सची आधी अप्पर तर नंतर लोअर सर्किटला धडक बघायला मिळाली.
सुरुवातीच्या कालावधीतच कंपनीच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिटीग्रुपने अदानी सिक्युरिटीजच्या मार्जिन लोनवर स्थगिती ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच, क्रेडिट सुईसनेही आदल्या दिवशी अदानी समूहाचे रोखे घेण्यास नकार दिला होता. रिझव्र्ह बँकेने अदानी समुहाशी संबंध असलेल्या विविध बँकांकडून तपशील मागितल्याचे देखील वृत्त पसरले होते. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घट होत असल्याने अदानी यांच्या संपत्तीतही घट होत आहे. यामुळे श्रीमंतांच्या यादीतील त्यांचे स्थान खालावत आहे. तिसऱ्या क्रमांकावरून आत्ताच त्यांचे स्थान 16 व्या क्रमांकावर घसरले आहे.