सलग पाचव्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाला आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 909.64 अंकांनी वाढून 60,841.88 वर बंद झाला. तसेच निफ्टी 243.65 अंकांनी वाढून 17,854.05 वर बंद झाला आहे. तर निफ्टी बँक 830 अंकांनी वधारून 41,500 अंकावर बंद झाला आहे. टायटन आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स अनुक्रमे 7 टक्के आणि 6 टक्क्यांनी वाढले आहेत.
अदानी एन्टरप्रायझेसने अनुभवले मोठे चढ उतार
शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खालच्या स्तरावरून 55 टक्क्यांहून अधिक वाढले होते. त्याचे शेअर्स 1586 रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत. डिसेंबर तिमाहीच्या मजबूत निकालानंतर टायटनचे शेअर्स 7 टक्क्यांनी वाढले. बजाज फायनान्स आणि बजाज फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्येही प्रत्येकी पाच टक्क्यांनी वाढ झाली. एचडीएफसी बँकेचे शेअर्स 3.5 टक्क्यांनी वधारले.
आठवड्याच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात देशांतर्गत शेअर बाजारात तेजीने झाली होती. यादरम्यान सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी वाढला होता, तसेच दुसरीकडे सकाळच्या वेळेत निफ्टी 17700 च्या आसपास व्यवहार करताना दिसत होता. सुरुवातीच्या कालावधीत सेन्सेक्स वाढीसह 60,200 अंकांच्या पुढे ट्रेड करत होता. दुसरीकडे, सुरुवातीच्या कालावधीत निफ्टी 61 अंकांच्या वाढीसह 17660 च्या पातळीवर ट्रेड करताना बघायला मिळत होता. टायटनचे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात 5% वाढ दाखवत होते, त्यापुढेही वाढ बघायला मिळाली. तर सकाळच्या वेळेतच अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 10 टक्क्यापर्यंत घसरताना बघायला मिळाले. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 417 अंकांनी वाढून 60350 वर तर निफ्टी 111 अंकांनी वाढून 17721 वर आणि बँक निफ्टी 350 अंकांनी वाढून 41019 वर उघडला होता.