केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणांदरम्यान एकूण दिवसभराचा विचार केला तर मार्केटमध्ये संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. अर्थसंकल्पीय घोषणांचे
काही प्रमाणात सेन्सेक्सने स्वागत केले. पण आज निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. अर्थसंकल्पाच्या दिवशी 158.18 अंकांच्या वाढीसह 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक 59,708.08 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, 50 शेअर्सचा निफ्टी 50 निर्देशांक 45.85 अंकांनी घसरून 17616.30 अंकांवर बंद झाला.
अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती. 450 अंकाची वाढ सेन्सेक्समध्ये सुरुवातीलाच झाली होती. मात्र यादरम्यान सेन्सेक्सने 60773 अंकांची दिवसभरातील सर्वोच्च पातळी गाठली होती. अर्थसंकल्प सादर करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर 1200 अंकांपर्यंत वाढ झाली होती. यानंतर पुन्हा विक्री दिसून आली. यानंतर पुन्हा घसरण होऊ लागली. दिवसअखेर बाजार 59,708 अंकांच्या पातळीवर बंद झाला. बाजारात शेवटच्या क्षणी खरेदी दिसून आली. आदल्या दिवशीच्या बंदच्या तुलनेत बाजारात 158 अंकांची किरकोळ वाढ झाली. दुसरीकडे निफ्टी 17 हजार 972 वरून 17616 अंकांवर बंद झाला. बजेटच्या दिवशी निफ्टीने 17811 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला. बाजारातील 653 अंकांची सर्वोच्च पातळी तोडल्यानंतर निफ्टी 45 अंकांनी घसरून बंद झाला.
IT आणि FMCG क्षेत्रातील शेअर्स वधारले
अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारातील बहुतांश क्षेत्रांमध्ये विक्री दिसून येत होती. मात्र, या कालावधीत आयटी समभाग आणि एफएमसीजी समभागांमध्ये खरेदी दिसून आली. एफएमसीजी आणि आयटी निर्देशांक निफ्टीवर 1 टक्क्यांनी वाढले आहेत. बँक आणि वित्तीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले आहेत. दुसरीकडे, धातू निर्देशांकात 4.50 टक्क्यांनी घट झाली आहे. ऑटो, फार्मा आणि रियल्टी निर्देशांक घट होत बंद झाले.