भारतात वाडीलाल (Vadilal) ग्रुपचे आईस्क्रीम प्रॉडक्ट्स अत्यंत लोकप्रिय आहेत. हाच ब्रँड आता अधिक मोठा होणार आहे. सीएनबीसीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यानुसार, बेन कॅपिटल (Bain Capital) आता ब्रँडसह वाडीलाल इंडस्ट्रीज आणि वाडीलाल एंटरप्रायझेसचं अधिग्रहण करणार आहे. अमेरिकेचा प्रायव्हेट इक्विटी फंड बेन कॅपिटल आइस्क्रीम बनवणारी कंपनी वाडीलाल विकत घेण्याची तयारी करत आहे. विलीनीकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत बेन कॅपिटल वाडीलाल कंपन्यांना मोठी कंपनी बनवण्यावर जोर देणार आहे.
कंपनीकडून अधिकृत वक्तव्य नाही
वाडीलालच्या आईस्क्रीम व्यवसायाची एकूण किंमत 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याआधी अर्पवुडनं (Arpwood) वाडीलालमधलं भागभांडवल खरेदी करण्याची ऑफर दिली होती. मात्र, वाडीलालच्या प्रवर्तकांमध्ये यासंदर्भात मतभेद झाले. त्यामुळे विक्रीला उशीर झाला. वाडीलाल ग्रुप, बेन कॅपिटल आणि अर्पवुडकडून अधिकृतरित्या याबाबत कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही. याआधी वाडीलाल इंडस्ट्रीजनं प्रवर्तकांकडून ब्रँड खरेदी करण्यासाठी भागधारकांकडून डिसेंबर 2022मध्ये मंजुरी घेतली होती.
उद्योग तज्ज्ञांचं मत
उद्योग तज्ज्ञांच्या मते, कोणताही खासगी इक्विटी गुंतवणूकदार दोन लिस्टेड कंपन्या आणि वाडिलाल ब्रँडच्या विलीनीकरणात स्वारस्य दाखवणार नाही. वाडीलाल इंडस्ट्रीज आइस्क्रीम आणि फ्रोझन फूडचा व्यवहार करते. तर, वाडीलाल एंटरप्रायझेस या उत्पादनांचं विपणन आणि विक्री करते.
दोन्ही कंपन्यांचे वधारले शेअर्स
वाडीलाल इंडस्ट्रीजचा समभाग 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 3,209 रुपये प्रति शेअरवर सोमवारी (10 जुलै) व्यवहार करत होता. दुपारी 1नंतर या शेअरमध्ये अचानक मोठी तेजी दिसून आली. शेअरनं इंट्रा-डे उच्चांकी 3,294.65 रुपये प्रति समभाग गाठला. 52 आठवड्यांचा तो नवा उच्चांक आहे. त्याचबरोबर वाडीलाल एंटरप्रायझेसचा शेअर 4.27 टक्क्यांच्या वाढीसह 4,035 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करताना दिसला. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4,600 रुपये प्रति शेअर आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1,700 रुपये प्रति शेअर आहे.