सेबी (Securities and Exchange Board of India) भांडवली बाजारातल्या गैरकारभाराविरोधात आक्रमक झालीय. आता एका संस्थेच्या संचालकाला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. अल्केमिस्ट इन्फ्रा रियल्टी लिमिटेड (Alchemist Infra Realty Ltd) असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीच्या संचालकाला हा दंड ठोठावला आहे. बलवीर सिंग असं संबंधित व्यक्तीचं नाव आहे. सामूहिक गुंतवणुकीद्वारे बेकायदेशीरपणे (Illegal) लोकांकडून निधी गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. पुढच्या 45 दिवसांत दंडाची ही रक्कम भरावी लागेल, असं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय. झी बिझनेसनं हे वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
गुंतवणूक योजनेत नियमांचं उल्लंघन
अल्केमिस्ट इन्फ्रामधल्या गैरकारभाराच्या या प्रकरणात सेबीनं अल्केमिस्ट आणि या कंपनीच्या संचालकांविरुद्ध न्यायालयीन कारवाई सुरू केली होती. अल्केमिस्ट इन्फ्रा रियल्टी लिमिटेड कंपनी आणि तिच्या संचालकांनी सामूहिक गुंतवणूक योजनेच्या (Collective investment scheme) नियमांचं उल्लंघन केलंय, असं सेबीला तपासाअंती आढळून आलं. यासंबंधी फेब्रुवारी 2021मध्ये बाजार नियामक सेबीनं एक आदेश जारी केला. यानुसार अल्केमिस्ट इन्फ्रा रियल्टी लिमिटेड आणि तिच्या संचालकांना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मार्केट रेग्युलेटर अंतर्गत नोंदणी नाही
या गैरकारभारात बलवीर सिंगचादेखील समावेश आहे. कारण बलवीर सिंग यानं लोकांकडून निधी जमा करण्याच्या उपक्रमात सहभाग दर्शविला होता. बलवीर सिंगची मार्केट रेग्युलेटर अंतर्गत नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यानंतरही सामूहिक गुंतवणूक योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे हा दंड आकारण्यात आलाय.
बलवीर सिंगविरोधात सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनलनं (SAT) सिंह सेबीचा आधीचा आदेश बाजूला ठेवलाय आणि मार्केट रेग्यूलेटरला एक नवा आदेश पास करण्यास सांगितलंय. सेबीच्या न्यायिक अधिकारी सोमा मुझुमदार यांनी आदेशात म्हटलंय, की बलवीर सिंग एप्रिल 2008 ते फेब्रुवारी 2009 या कालावधीत अल्केमिस्टचे संचालक होते आणि या काळात गुंतवणूक कराराच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक निधी गोळा केला. मात्र हे करत असताना सामूहिक गुंतवणूक योजनेच्या नियमांचं उल्लंघन केलं. विशेष म्हणजे या काळात बलवीर सिंग यांच्याकडे नियामकाची नोंदणीही नव्हती.
सेबीचा आणखी एक आदेश
सेबीनं आणखी एक आदेश काढला. बुल रिसर्च इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स आणि त्यांच्या संचालकांवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याचा हा आदेश आहे. संबंधित लोकांनी नियामक नियमांचं उल्लंघन केलं होतं, असं सेबीचं म्हणणं आहे. SCORESमध्ये कंपनीविरुद्ध तक्रारी प्रलंबित होत्या. या सर्व तक्रारीनंतर सेबीनं चौकशी केली आणि हा आदेश जारी केला. या कंपनीच्या संचालकांच्या यादीत आसिफ शेख, विनीत सातपुते आणि संदीप कुशवाह यांचा समावेश होता. फेब्रुवारी 2023मध्ये, सेबीनं कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली होती.
विविध कंपन्यांवर कारवाई
सेबीनं अलिकडेच विविध कंपन्यांवर कारवाई केली होती. चुकीचं ट्रेडिंग करणाऱ्या 7 संस्थांना प्रत्येकी 5 लाखांचा दंड ठोठावला होता. एका कंपनीवर 6 महिन्यांची बंदीही घातली. त्यानंतर 5 कंपन्यांवर याच कारणासाठी दंड ठोठावला होता. तर नुकतीच 3 कंपन्यांवर मोठी कारवाई केली होती. या तीन संस्थांना मिळून 41 लाखांचा दंड ठोठावला होता. आता गैरकारभार करणाऱ्या कंपनी आणि संचालकांवर दंडाची कारवाई केलीय.