Financial Influencers: फायनान्शिअल इन्फ्लूएन्सर्ससाठी सेबी लवकरच नियमावली आणणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटरसह अनेक सोशल मीडिया माध्यमांवर आर्थिक सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. काही इन्फ्लूएन्सर्स नागरिकांना चुकीचा गुंतवणूक सल्ला देत असल्याचे सेबीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यात यावर चर्चा होऊन नियमावली निश्चित केली जाईल.
सेबीच्या प्रमुख मधाबी पुरी बूच यांनी याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने 35 सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सना कोट्यवधींचा कर चुकवल्याप्रकरणी नोटीस पाठवल्या होत्या. मागील आठवड्यात केरळमधील 13 फायनान्शिअल इन्फ्लूएन्सर्सवर देखील अशीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता सेबीनेही नियमावली तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.
फायनान्शिअल इन्फ्लूएन्सर्ससाठी नियमावली लवकरच तयार होईल. त्यावर नागरिकांना प्रतिक्रियाही देता येतील. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या शिक्षित करण्याबद्दल आम्हाला कोणतीही अडचण नाही. मात्र, सेबीकडे नोंदणी नसतानाही चुकीचा सल्ला देणारे इन्फ्लूएन्सर्सचा प्रश्न गंभीर आहे, असे बुच म्हणाल्या. या आधी सेबीने काही व्हॉट्सअॅप ग्रूप आणि टेलिग्राम चॅनलवर बंदी घातली आहे.
चुकीचे मार्गदर्शन आणि सल्ला दिल्याने गुंतवणूकदारांची दिशाभूल
सर्वसामान्य नागरिकांना चुकीचा सल्ला देणारे अनेक आर्थिक सल्लागार सेबीच्या निदर्शनास आले आहेत. शेअर मार्कटमध्ये कोठे गुंतवणूक करावी, किंवा कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवावे याबाबत चुकीचा सल्ला या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सकडून दिला जात आहे. त्यामुळे ठराविक स्टॉकच्या किंमती वर जाऊन किंवा खाली येऊन हे इफ्लूएन्सर्स नफा कमावत आहेत. तसेच ब्रोकर्स आणि म्युच्युअल फंड हाऊसच्या योजनांची जाहिरात करूनही पैसा कमावतात. मात्र, यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
म्युच्युअल फंड, बोकर्स कंपन्यांसाठीही सेबी नियम बनवणार
म्युच्युअल फंड हाऊस आणि बोकर्स फायनान्शिअल इन्फ्लूएन्सर्सकडून आपल्या गुंतवणूक प्रॉडक्ट्सची जाहिरात करून घेतात. सोशल मीडियाद्वारे चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी इन्फ्लूएन्सर्ससोबत मिळून जाहिराती करण्यावर फंड हाऊसेस आणि ब्रोकर्सवर बंधने येऊ शकतात. सेबी गुंतवणूक कंपन्यांना याबाबत नियमावली तयार करण्याच्या तयारीत आहे.