SEBI Ban Arshad Warsi: यूट्यूब चॅनलद्वारे गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अभिनेता अर्शद वारसीवर कारवाई केली आहे. अर्शद वारसी त्याची पत्नी आणि इतर 29 जणांवर शेअर बाजारातील व्यवहार करण्यावर निर्बंध आणले आहेत. शेअरच्या किंमतींमध्ये फेरफार, यूट्यूबद्वारे गुंतवणुकदारांची दिशाभूल होईल, अशी माहिती दिल्याचे सेबीने म्हटले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता यामध्ये अडकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फेरफार आणि घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर निर्बंध आणण्यासाठी सेबीने दोन ऑर्डर पास केल्या आहेत. तसेच या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. अर्शद वारसी त्याची पत्नी Maria Goretti हिच्यावरही कारवाई झाली आहे. खोटी, दिशाभूल (SEBI Ban Arshad Warsi) करणारी माहिती देऊन ठराविक कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्याचे आवाहन या यूट्यूब चॅनलद्वारे करण्यात येत होते. काही गुंतवणूकदारांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर सेबीने कठोर कारवाई केली.
या 31 जणांमध्ये अनेक जण कंपन्यांचे मालक आहेत. श्रेया गुप्ता, गौरव गुप्ता, पुजा अगरवाल आणि वरुण मेदिया या काही व्यक्तींचा यात समावेश आहे. यूट्यूब चॅनलवर कंपन्यांबाबत कोटी माहिती पसरवून गुंतवणूकदारांकडून 41.85 कोटी रुपये मिळवल्याचा ठपकाही सेबीने ठेवला आहे.
अर्शद वारसीने किती रुपये कमावले?
अभिनेता अर्शद वारसीचा या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे. त्याने 29.43 लाख रुपये तर त्याच्या पत्नीने 37.56 लाख रुपये कमावल्याचे सेबीने म्हटले आहे. काही कंपन्यांच्या शेअर्सबाबत खोटी माहिती यूट्यूबवरुन दिल्याचे सेबीने म्हटले आहे. साधना ब्रॉडकास्ट या कंपनीच्या शेअर्समध्ये अफरातफर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कंपनीचे शेअर्स अर्शद वारसी यांच्याकडून खरेदी करण्यात आले, मात्र, नंतर विकण्यातही येत असल्याचे आढळून आले. यामध्ये साधना ब्रॉडकास्ट कंपनीच्या प्रमोटर्सचाही समावेश आहे.
2022 साली झालेल्या व्यवहारांची सेबीने चौकशी केली असता अनियमितता आढळून आली. साधना ब्रॉडकास्ट कंपनीचे शेअर्स खरेदी गुंतवणूकदारांनी खरेदी करावेत यासाठी खोटी माहिती या यूट्यूब चॅनल्सद्वारे पसरवण्यात आली होती, असे सेबीने म्हटले आहे.
अर्शद वारसीने आरोप फेटाळले? (Arshad Warsi comment On SEBI ban)
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या असल्याचे अर्शद वारसीने म्हटले आहे. "माध्यमांमध्ये छापून आलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मला आणि माझ्या पत्नीला शेअर मार्केटचे काहीही ज्ञान नाही, आम्ही सल्ला घेऊन गुंतवणूक केली होती. मात्र, आमचीही गुंतवणूक बुडाली", असे ट्विट अर्शद वारसीने केले आहे.