Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Karvy Stock Broker: कार्वी स्टॉक ब्रोकर कंपनीची नोंदणी रद्द; गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्यामुळे कारवाई

Karvy Stock Broker

कार्वी स्टॉक ब्रोकर लिमिटेड (KSBL) या कंपनीची नोंदणी सेबीने रद्द केली आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने सेबीने ही मोठी कारवाई केली. कंपनीच्या मालकाला दंडही ठोठावण्यात आला आहे.

Karvy Stock Broker: कार्वी स्टॉक ब्रोकर लिमिटेड (KSBL) या कंपनीची नोंदणी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) रद्द केली आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या ब्रोकर्स संस्थेने गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने सेबीने कारवाई केली.

कार्वी संस्थेकडून निधीचा गैरवापर 

कार्वी स्टॉक ब्रोकर या संस्थेने गुंतवणुकदारांकडून जो निधी जमा केला होता तो नियम डावलून स्वत:च्या मालकीच्या कंपन्यांमध्ये वळवला. संस्थेच्या खात्यावरुन खासगी खात्यावर पैसे वळते केल्याचे अनेक व्यवहार सेबीच्या निदर्शनास आले. तसेच कंपनीने कर्ज आणि तारण स्वरुपात इतर कंपन्यांना पैसे दिल्याचेही समोर आले. ही सर्व कामे ब्रोकर संस्थेने नियमबाह्य पद्धतीने केल्याचे निदर्शनास आल्याने सेबीने कारवाई केली. हरियाणातील गुरगाव येथे Karvy Stock Broker चे कार्यालय आहे. तसेच इतरही अनेक शाखा आहेत.

ब्रोकर संस्थेची नोंदणी रद्द केल्याची अधिकृत माहिती आज सेबीने दिली. (SEBI cancels registration of Karvy Stock Broker)  मात्र, त्याआधी 28 एप्रिल 2023 ला सेबीने कंपनीचे मालक आणि संस्थेला भांडवली बाजारातून 7 वर्ष बेदखल केले. म्हणजेच या कंपनीच्या प्रमोटर्सला आणि ब्रोकर्स संस्थेलाही भांडवली बाजारातील व्यवहार करता येणार नाही. राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारावर ब्रोकर फर्मला बंदी घालण्यात आली आहे.

नोंदणी रद्द केली असली तरी या संस्थेकडे जर काही शुल्क किंवा दंड प्रलंबित असेल तर तो भरावा लागेल. तसेच कोणत्याही इतर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सीबने नोटिशीत म्हटले आहे.  (SEBI cancels registration of Karvy Stock Broker)  कार्वी संस्थेने केलेले आर्थिक व्यवहार, बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे सादर करण्यासही असमर्थतता दर्शवली. तसेच सेबीद्वारे करण्यात येणाऱ्या लेखापरीक्षणाला प्रतिसाद दिला नाही, असे म्हटले आहे.

कंपनीच्या मालकाला 21 कोटींचा दंड

गुंतवणुकदारांच्या निधीचा फेरफार केल्याप्रकरणी सेबीने कंपनीचे मालक Comandur Parthasarathy यांना 21 कोटींचा दंड केला आहे. 2000 कोटींपेक्षा जास्त निधीचा गैरवापर झाल्याप्रकरणी सेबीकडून 2019 पासून तपास सुरू आहे. दुसऱ्या ब्रोकर्स संस्थासोबत काम करण्यासही सेबीने कार्वी कंपनीला मनाई केली होती.