बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी चुकीच्या गोष्टीसाठी सध्या चर्चेत आहे. सेबीने त्याच्यावर शेअर बाजारात ट्रेडिंगसाठी बंदी घातलीय. तो आणि त्याची पत्नी मारिया गुरेटीवर ही कारवाई करण्यात आली आहे. युट्यूब व्हीडिओमध्ये छोट्या गुंतवणूकदारांना दिशाभूल करणारी शेअरविषयक माहिती दिल्याबद्दल ही कारवाई झालीय. नेमकं प्रकरण काय ते समजून घेऊया.
हे पंप अँड डम्पिंगचं प्रकरण असल्याचं सेबीने म्हटलंय. म्हणजे शेअरची चुकीच्या पद्धतीने जाहिरात करणं आणि तज्ज्ञ नसतानाही शेअरबद्दल अधिकारवाणीने बोलणं. अर्शद वारसी यांच्या व्हीडिओनंतर त्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचं 50 कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं.
Table of contents [Show]
काय होते नेमके प्रकरण
साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्सच्या किमतीत हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी सेबीकडे सतत येत होत्या. या प्रकरणाचा तपास करता करता सेबी अर्शद वारसीपर्यंत येऊन पोहोचली. सेबीने गुरुवारी अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी आणि साधना ब्रॉडकास्टच्या प्रवर्तकांसह 44 संस्थांना रोखे बाजारातील व्यापारावर बंदी घातली.
दिशाभूल करणाऱ्या YouTube व्हीडिओद्वारे गुंतवणूकदारांना आमीष दाखवलं जात असल्याचं सेबीचं म्हणणं आहे. सेबीने गेल्यावर्षी एप्रिल-सप्टेंबर दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. साधना ब्रॉडकास्ट या कंपनीच्या शेअरसाठी अर्शन वारसी आणि त्याची पत्नी मारिया गुरेटी यांनी व्हीडिओ बनवले, जे युट्यूबवर प्रसारित करण्यात आले.
त्यामुळे अनेकांनी या शेअरमध्ये गुंतवणूकही केली. पण, यात त्यांचे पैसे बुडाले. तर प्रवर्तकांनी शेअरची किंमत फुगल्यावर शेअर डंप केला. म्हणजे आपले पैसे काढून घेतले.
त्यामुळे प्रवर्तकांवरही सेबीने बंदी आणली आहे. अर्शद वारसीने या प्रकरणानंतर एक ट्टिट करून आपली भूमिका मांडली. ‘अफवांवर विश्वास ठेवू नका. मला शेअरमधलं काही कळत नाही. उलट लोकांवर विश्वास ठेवून मी माझे कष्टाच्या कमाईचे 17 लाख रुपये शारदा कंपनीत गुंतवले. आणि ते पैसे साफ बुडाले आहेत,’ असं म्हटलं आहे.
Please do not believe everything you read in the news. Maria and my knowledge about stocks is zero, took advice and invested in Sharda, and like many other, lost all our hard earned money.
— Arshad Warsi (@ArshadWarsi) March 2, 2023
नियम काय सांगतो?
सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लोकांना सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारे कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यास प्रोत्साहन देणं किंवा शेअरची जाहिरात करणं हे पंप अँड डम्पिंग मानलं जातं.
यातून गुंतवणुकदारांची दिशाभूल होत असल्याचं मानलं जातं. शेअरचं विश्लेषण करतानाही सेबीने काही नियम घालून दिले आहेत, जे तज्ज्ञांनाही लागू होतात.
अर्शद वारसी आणि त्याची पत्नी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना काही विशिष्ट कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री सुचवून दिशाभूल करणारे व्हिडिओ बनवत होते, असा आरोप आहे.
चुकीच्या पद्धतीने कमावलेले पैसे परत करावे लागतील
सोशल मीडियावर अनपेक्षित 'टिप्स' देऊन लोकांना शेअर्स खरेदी करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सेबीने म्हटले आहे. अशा शेअरवर सेबीचं अतिरिक्त लक्ष असेल.
अशा शेअरच्या किमतीत 5% पेक्षा जास्त फरक पडला तर सर्किट लावलं जाऊ शकतं.
आणि महत्त्वाचं म्हणजे पंप अँड डम्पिंग प्रकारातून मिळालेले पैसे प्रवर्तकांना परत द्यावे लागतात. तोच नियम शार्पलाईन आणि साधना ब्रॉडकास्ट या कंपन्यांनाही लागू होईल. आता शार्पलाईटला 12 कोटी तर साधनाला 42 कोटी रुपये सेबीला परत करावे लागणार आहेत.
पंप आणि डंप म्हणजे काय?
शेअर बाजाराच्या किमती कृत्रिमरीत्या फुगवणं आणि मग अचानक कमी करणं याला पंप अँड डम्पिंग असं म्हणतात. किमतीच्या मॅनिप्युलेशनचा हा प्रकार आहे. आणि हे घडावं यासाठी शेअरचा चुकीच्या मार्गाने प्रचार केला जातो.
हा प्रचार किंवा जाहिरात म्हणजे एखाद्या फसव्या योजनेच्या केलेल्या जाहिराती सारखी असते. जाहिरातीला भुलून लोक त्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. आणि मग फसतात. अचानक वाढलेल्या मागणीमुळे शेअर वर चढत जातो. आणि मग एका मर्यादेनंतर तितकाच झटपट कोसळतोही. सुरुवातीच्या या पम्पिंग नंतर डंपर्स आपली भूमिका बजावतात.
आपली गुंतवणूक घेऊन ते शेअरमधून बाहेर पडतात. आणि त्यामुळे घसरण सुरू होते. लोकांचं नुकसान होतं.
अशी चालते बनवाबनवी!
जर तुम्हाला सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल एक उदाहरण समजून घेऊ. खोट्या प्रचारासाठी स्वतःला 'मार्केट गुरू' समजणारे लोक मोठ्या प्रमाणात काही विशिष्ट कंपन्यांचे शेअर्स आगाऊ खरेदी करतात. काही व्हिडियो बनवून सोशल मीडियावर टाकतात आणि विशिष्ट कंपन्यांचे शेयर्स घेण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना देतात.
त्यामुळे शेअर्स तेजीत आहेत असे समजून सामान्य गुंतवणूकदार शेअर्समध्ये पैसे गुंतवतात. त्यामुळे शेअर्सची किंमत अनेक पटींनी वाढते. मग हे 'मार्केट गुरू' पूर्वी कमी किमतीत खरेदी केलेले शेअर्स चढ्या किंमतीत विकून नफा कमवतात. कालांतराने मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री झाल्यामुळे शेअर्सच्या किमती घसरतात.
यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे मात्र पैसे बुडतात. आजकाल हा घोटाळा यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केला जात आहे.